Goa Crime (File Photo)
गोवा

Goa Crime | जुनेगोवेत अर्भकासह पत्नीच्या विक्रीचा कट फसला

AHTU West Bengal | संशयित गजाआड, गोवा पोलिस, पश्चिम बंगालच्या ‘एएचटीयू’ची संयुक्त कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पणजी : कलिंगपोंग-पश्चिम बंगाल येथे घडलेल्या महिला आणि नवजात बालकाच्या तस्करी प्रकरणात मुख्य आरोपी पिंकू रॉय याला जुने गोवे पोलिस आणि पश्चिम बंगालच्या मानवी तस्करीविरोधी शाखेच्या (एएचटीयू) पथकाने संयुक्तपणे अटक केली. कलिंगपोंग येथील मानवी तस्करीविरोधी पथकाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक शांती लामा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी 29 जून 2025 रोजी जुने गोवे पोलिसांच्या मदतीने गोव्यातून आरोपीला शोधून काढले. यासाठी दोन्ही पथकांनी अनेक दिवस जुने गोवेत गुप्त पाळत ठेवली होती. सिलचर-आसाम येथील 34 वर्षीय पिंकू रॉय हा जुने गोवेतील एका हॉटेलमध्ये राहत होता, कलिंगपोंग महिला पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आरोपी पिंकू रॉय व त्याचा मालक अरुण प्रकाश शेट्टी (रा. कर्नाटक) यांनी तिची व तिच्या नवजात बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

पीडित महिलेने 2023 मध्ये संशयित आरोपीशी विवाह केला होता. काही काळ बंगळुरू, केरळ व कर्नाटकमध्ये वास्तव्य केल्यानंतर दोघांनी एकत्र रेस्टॉरंटमध्ये काम सुरू केले होते. मात्र 6 ऑगस्ट 2024 रोजी पती व मालकाने तिला दुसर्‍या ठिकाणी नेण्याचा आणि तेथून तिची व तिच्या बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न केला, अशी गंभीर तक्रार पीडित महिलेने दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पश्चिम बंगाल पोलिस पथकाने गोव्यात येऊन जुने गोवे पोलिसांच्या सहकार्याने संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

पोलिस पथक पश्चिम बंगालकडे रवाना

संशयित आरोपीला मेरशी न्यायालयात हजर करून 7 दिवसांचा ट्रांझिट रिमांड मिळवण्यात आला आणि संशयित आरोपीस घेऊन पथक मंगळवारी 1 जुलै रोजी पश्चिम बंगालकडे रवाना झाले. या कारवाईत जुने गोवे पोलिस अधिकार्‍यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मानवी तस्करीतील संशयिताला दोन्ही पोलिस पथकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गजाआड करता आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT