पणजी : गोव्यात मित्राकडे आलेल्या मोथे साईराम याचा चॉपरने खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित साहित हुसेन बापू याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा आदेश मेरशी अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला. संशयिताविरुद्ध आरोप सिद्ध करण्याइतपत पुरेसा पुरावा पोलिसांनी सादर केला असल्याचे निरीक्षण न्यायालयाने केले आहे.
प्रथमदर्शनी सीसीटीव्ही फुटेज व पोलिसांनी नोंदवलेल्या पीडित मोथे याच्या जबानीवरून समोर आलेले प्रत्यक्षदर्शी माहिती संशयिताविरुद्ध गंभीर संशय निर्माण करणारी आहे. त्याने चॉपरचा वापर करून मोथे याच्यावर हल्ला केल्याचे पुराव्यात उघड झाले आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. हणजूण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात संशयिताविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
मोथे साईराम हा २ सप्टेंबर २०२५ रोजी सुट्टीच्या काळात गोव्यात आला होता व त्याचा मित्र नुरुद्दीन मुल्ला याच्याकडे हणजूण येथील डाऊन टाऊन हॉस्टेलमध्ये राहत होता. त्यानंतर त्यांनी हॉस्टेल बदलून मुडपॅकर्स हॉस्टेलमध्ये राहत होते. १६ सप्टेंबर २०२५ रोजी मोथे व त्याचा मित्र मध्यरात्रीच्या सुमारास हाऊस ऑफ शापोरा या बार व रेस्टॉरंटमध्ये गेले होते. दोघांनी भरपूर दारू घेतली. मोथे याला दारूची नशा चढल्यानंतर तो मित्राला न सांगताच तेथून बाहेर पडला. मुडपॅकर्स हॉस्टेलकडे जाणाऱ्या रस्त्याने जाण्याऐवजी तो अवतार बार एन किचन तेथे गेला. त्याने भांडण सुरू केल्याने संशयित साहित हुसेन बापू याने चॉपरने धाक दाखवत त्यानंतर त्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता.
मोथे याच्या शोधार्थ त्याचा मित्र गाडीने फिरत असताना त्याने काहींना त्याचे छायाचित्र दाखवले. अखेर मोथे हा रक्ताच्या थारोळ्यात अवतार पबच्या बाजूला पडलेला दिसला. स्थानिकांच्या मदतीने त्याला मित्राने गोमेकॉ इस्पितळात नेले. हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवतार पबच्या मालकाचे छायाचित्र दाखवले असता जखमी मोथे याने ओळखले. पोलिसांनी लगेच संशयित साहित हुसेन बापू याच्या मुसक्या आवळल्या होत्या व हल्ल्यासाठी वापरलेले हत्यारही जप्त केले होते.