Fraud Case file photo
गोवा

Goa crime news | बनावट दागिने तारण ठेवून बँकेला गंडा; आरोपपत्र दाखल

२.६३ कोटींचा अपहार; मनी लाँड्रिंगच्या संशयामुळे ईडीकडूनही कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पणजी : बनावट दागिने तारण ठेवून युको बँकेची २.६३ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) संशयित हेमंत रायकर आणि गुंडू यल्लपा केळवेकर यांच्यासह इतरांविरोधात मेरशी येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

बँकेचे तत्कालीन सरव्यवस्थापक ज्ञानंद शर्मा यांनी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे (ईओसी) तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी संशयित हेमंत रायकर हा बँकेतील दागिन्यांचे मूल्यांकन करणारा सुवर्णकार आहे. त्याने संशयित गुंडू यल्लपा केळवेकर यांच्याशी संगनमत करून बँकेच्या वेर्णा, फातोर्डा आणि मडगाव शाखेतून १२ जुलै २०१९ ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान बनावट दागिने तारण ठेवून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने २,६३,०७,२८० रुपये कर्ज घेतले. यासाठी हेमंत रायकर यांनी बनावट दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. तक्रारीची दखल घेऊन ईओसीने वरील संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली होती. या गुन्ह्याची दखल घेऊन ईडीने प्राथमिक चौकशी सुरू केली होती. त्यात मनी लाँड्रिंगचा संशय असल्याचे समोर आल्यानंतर ईडीने कारवाई सुरू केली.

१.६० कोटी रुपयांची तात्पुरती मालमत्ता जप्त

संशयितांचे मडगाव येथील १.१७ कोटी रुपये किमतीचे एक दुकान, गुंडू केळवेकर याच्या पत्नीच्या बँक खात्यातील आणि एका सोनारकडे असलेले दागिने तात्पुरते जप्त केले आहेत. या प्रकरणात ईडीने यापूर्वी १.६० कोटी रुपयांची तात्पुरती मालमत्ता जप्त केली होती. दरम्यान, या प्रकरणी ईडीने संशयित हेमंत रायकर आणि गुंडू यल्लपा केळवेकर यांच्यासह इतरांविरोधात पीएमएलए अंतर्गत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT