पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे दोन आंतरराज्यीय अमली पदार्थ टोळ्यांचा पर्दाफाश केला. पहिल्या प्रकरणात १८ जून २०२६ रोजी, विश्वसनीय गुप्त माहितीच्या आधारे, गुन्हे शाखेने अभिराम पुलिक्कल (वय २६, मूळ केरळ, कोझिकोड, सध्या रा. हडफडे, बार्देश) याला स्कूटर (GA-03-AX-1896) वरून प्रवास करत असताना अटक केली.
झडतीत त्याच्याकडून गुन्हे शाखेने ९१.५५७ ग्रॅम मेथाम्फेटामाइन आणि ९.०७६ ग्रॅम एमडीएमए जप्त केले, ज्याची एकत्रित किंमत अंदाजे २.६५ लाख आहे. यावेळी पोलिसांनी ती स्कूटर आणि एक मोबाईल फोनही जप्त केला.
चौकशीत असे आढळले की, संशयिताला याआधी अटक झाली होती व तो कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात होता. तपासात असे उघड झाले की, तो त्याच एनडीपीएस प्रकरणातील दोषी आरोपी अझरुद्दीन आची उर्फ असारू याच्या संपर्कात आला होता, जो कथितरीत्या मध्यवर्ती कारागृहातूनच अमली पदार्थाच्या वितरणाचे जाळे चालवत होता. त्यानुसार, गुन्हे शाखेने पुढील तपासासाठी न्यायालयाकडून त्याची कोठडी मिळवली.
पुढील तपासात त्याचे दोन साथीदार, मूसान मुखिरी आणि मोहम्मद फैजान, हे दोघेही केरळमधील कन्नूरचे रहिवासी असून, ते दिल्लीतून आपले काम चालवत असल्याचे निष्पन्न झाले. ते ११ जुलै २०२६ रोजी दिल्लीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवहार करणार होते. कारवाईची निकड लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी तात्काळ दिल्ली गुन्हे शांशी समन्वय साधला.
गोवा गुन्हे शाखेने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे, दिल्ली गुन्हे शाखेने यशस्वी छापा टाकला, यामध्ये १५१ ग्रॅम मेथाम्फेटामाइन आणि ५१२ ग्रॅम मॅजिक मशरूम जप्त करण्यात आले. हे दोन्ही पदार्थ एनडीपीएस कायद्यानुसार व्यावसायिक प्रमाणात असून, त्यांचे एकत्रित मूल्य अंदाजे ४० लाख रुपये आहे. त्यानुसार, दिल्ली गुन्हे शाखेने एनडीपीएस कायद्याच्या कलम २०(क), २२(क) सह कलम २९ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
संशयित आरोपी मोहम्मद फैजान आणि मूसान मुखिरी सध्या दिल्ली गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. गोवा गुन्हे शाखा पुढील तपासासाठी त्यांची कोठडी मिळवण्याकरिता प्रयत्न करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक (गुन्हे) राहुल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधीक्षक जीवबा दळवी, पोलिस निरीक्षक अर्जुन सांगोडकर, पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर, पोलिस उपनिरीक्षक माधव नाईक,
सहायक उपनिरीक्षक संतोष गोवेकर, पोलिस कॉन्स्टेबल दत्तात्रय शेट वेरेकर, संदेश वळवईकर, नितीन गावस, अनिल पवार आणि अझीम पटेल यांच्या पथकाने केली. दुसऱ्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या गुप्त माहितीच्या आधारे फरार दरोडेखोर आणि गांजा तस्करीच्या सूत्रधाराला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने वेरे, बार्देश येथील कालीचरण भोल याला अटक केली आणि अंदाजे ८० हजार रु. किमतीचा ८९२ ग्रॅम गांजा जप्त केला. तपासादरम्यान, पथकाला विश्वसनीय माहिती मिळाली की, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१० (२), १२७, ६१ (२) (अ) आणि गोवा बाल कायद्याच्या कलम ८ अन्वये परवरी पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक २७/२०२५ अंतर्गत नोंदवलेला फरार संशयित कृष्णा बेळगावकर, जो एका खून प्रकरणातील खटल्यातून पळ काढत होता,
तो हैदराबादमधून अमली पदार्थांचे नेटवर्क चालवत होता. गोवा गुन्हे शाखेने तात्काळ तेलंगणा अमली पदार्थ विरोधी ब्युरो (टीजीएएनबी) यांच्याशी समन्वय साधला. त्यांनी संबंधित आरोपीला यशस्वीरीत्या पकडले. त्यानंतर परवरी पोलिसांच्या एका पथकाने हैदराबादला जाऊन २९ जुलै २०२६ रोजी त्याला औपचारिकपणे अटक केली.