Casinos  file photo
गोवा

Goa Congress | 'सत्तेवर आल्यास पणजीतून 100% कॅसिनो हटवणार!' गोवा राखण यात्रेच्या पहिल्याच दिवशी युरी आलेमांव यांचा निर्धार

Goa Congress | युरी आलेमांव : काँग्रेसच्या गोवा राखण यात्रेला प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

२०२७ मध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यास पणजीतून १०० टक्के कॅसिनो हटवणार, असा निर्धार विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी गोवा राखण यात्रेच्या पहिल्याच दिवशी व्यक्त केला. भाजप सरकारने गोव्याच्या राजधानीची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख कॅसिनो उद्योगामुळे झाकोळून टाकल्याचा आरोप आलेमांव यांनी यावेळी केला.

आलेमांव म्हणाले की, एकेकाळी आपल्या वारशासाठी ओळखले जाणारे पणजी आता 'कॅसिनो शहर' म्हणून ओळखले जात आहे. पणजीतून कॅसिनो हद्दपार केले जातील का, असे विचारले असता, '१०० टक्के' असे उत्तर आलेमांव यांनी दिले. काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

सरकारविरोधातील जनमत काँग्रेसकडे वळवण्यासाठी काँग्रेसच्या गोवा राखण यात्रेला दि. २२ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबरदरम्यान राज्यभर फिरणार आहे. यात पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते. ही यात्रा २७ दिवसांत ४० मतदारसंघांत ठरेल.

दुपारी चारच्या सुमारास कदंब बसस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ वाहून अभिवादन करून यात्रेला सुरुवात केली. यात्रेत गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे,

सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, खासदार कॅप्टन विरियतो फर्नांडिस, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, आमदार ॲड. कार्लोस फेरेरा, आमदार अल्टन डिकॉस्टा, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील कवठणकर, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतीक्षा खलप, कार्यकारी अध्यक्ष एम. के. शेख, खजिनदार दत्ता नायक, समीळ वळवईकर, राजेश वेरेकर यांचा सहभाग होता.

काँग्रेस भवनाबाहेर सेवा दलाच्या वतीने सकाळी ध्वजारोहण केल्यानंतर यात्रेला सुरुवात झाली. पणजी बसस्थानक, मार्केट परिसरात यात्रेविषयीची माहिती देणाऱ्या पत्रकांचे वितरण करण्यात आले. यात्रेचा आजचा पहिला टप्पा पणजी ते ताळगाव असा झाला. आंबेडकर उद्यानातून सुरू झालेली यात्रा ताळगाव येथे पोहोचली आहे.

विविध मुद्द्यांवर होणार विचारमंथन

भाजपाला जिंकू देणार नाही, गोवा विकू देणार नाही, असा पवित्रा घेऊन काँग्रेसने गोवा वाचवण्यासाठी म्हणून ही गोवा राखण यात्रा सुरू केली आहे. यात्रेच्या विविध टप्प्यांमध्ये सर्व मतदारसंघांत सभा, लोकांशी संवाद आणि पक्ष कार्यकर्त्यांचे कार्यक्रम होणार आहेत.

यावेळी राज्यात वाढलेला भ्रष्टाचार, बेरोजगारी, अंमली पदार्थांचा विळखा, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, पर्यावरणाचा ऱ्हास, जमिनी बळकावणे, त्या रूपांतरित करण्याचे वाढते प्रकार, नगर नियोजन कायद्यातील कलम ३९ अ रद्द करण्याची गरज या मुद्द्यांवर लोकांशी संवाद साधून लोकांची मते विचारात घेतली जाणार आहेत.

के. सी. वेणुगोपाल आज कुंभारजुवेत

गोवा राखण यात्रा बुधवारी कुंभारजुवे मतदारसंघात जाणार आहे. या यात्रेला काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. वेणुगोपाल यात्रेला हिरवा झेंडा दाखवून यात्रेचे औपचारिक उद्घाटन करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT