Abuse Assault Pudhari
गोवा

Goa crime | प्राचार्याचा सुंभ जळाला, तरी पीळ गेला नाही

एकाच तुकडीचा निकाल जाहीर; विद्यार्थी, पालक वेठीस

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : कुशावती जिल्ह्यातील त्या प्राचार्याच्या लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले होते. मात्र, दै. 'पुढारी'त याबाबतचे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध होताच प्रशासनाने हे निकाल दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी जाहीर केले. परंतु, अद्यापही एका तुकडीचे निकाल जाहीर न केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

सध्या जाहीर केलेल्या निकालात ३५ विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थी नापास झाले असून, नापास करण्यात आलेल्यांपैकी ४ पीडित विद्यार्थी असल्याची अजून एक धक्कादायक माहिती उघड झाली. संबंधित विद्यार्थ्यांना मुद्दामहून नापास करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. निकाल जाहीर करण्याच्या आश्वासनावर सर्व पालक शाळेत जमले होते.

मात्र, प्राचार्यांनी पालकांना जवळपास दोन तास बाहेर उभे ठेवून केवळ एका तुकडीचा निकाल जाहीर केला. दुसऱ्या तुकडीचा निकाल जाहीर न केल्याने अनेक पालकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. या अर्धवट निर्णयामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षण खात्याने आणि शिक्षण मंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, असे मत काही पालकांनी 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केले.

तिने कॉलेजच सोडले...

सप्टेंबर २०२५ पासून संबंधित प्राचार्यांकडून एका विद्यार्थिनीचे शोषण होत असल्याचा एक गंभीर प्रकार समोर आला. या प्रकारामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या विद्यार्थिनीने अनेक महिला शिक्षकांकडे धाव घेत व्यथा मांडली होती. मात्र, तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. एका शिक्षकाने विद्यार्थिनीला शाळेबाहेर प्राचार्यांविरोधात बोलल्यास नापास करण्याची धमकी दिली होती. यामुळे विद्यार्थिनीवर प्रचंड दडपण आले आणि असुरक्षित वाटू लागल्याने तिने शाळेत येणेच बंद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT