सांगे: पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत मंत्री विश्वजित राणे व मंत्री सुभाष फळदेसाई. pudhari photo
गोवा

Goa News - मीराबाग बंधारा प्रकल्पाचे काम रद्द; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

आंदोलन स्थगितीनंतर शुभेच्छा देत लोकांचा जल्लोष, आझाद मैदानावर जाणाऱ्या पोलिसांनी रोखले आंदोलकांना

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : मीराबाग येथे बंधाऱ्याविरोधात गेले ४९ दिवस सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेल्या आश्वासनानंतर पूर्णविराम मिळाला. बंधारा प्रकल्प रद्द करण्यात येणार असल्याचे जाहीर होताच आंदोलकांनी एकमेकांना शुभेच्छा देत जल्लोष केला आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

मीराबाग (सावर्डे, कुडचडे-सांगे) येथील जुवारी नदीवरील प्रस्तावित बंधाऱ्याविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी गाव, निसर्ग आणि देवस्थानांच्या संरक्षणासाठी सलग ४९ दिवस धरणे आंदोलन छेडले होते. या काळात सावर्डे पंचायत, जलस्रोत खात्याचे कार्यालय येथे मोर्चे, मशाल मिरवणुका काढण्यात आल्या. तसेच मडगावच्या लोहिया मैदानावरही आंदोलनाचा आवाज घुमला. तरीही शासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने आंदोलकांनी 'चलो आझाद मैदान'चा नारा देत पणजीकडे मोर्चा वळवण्याचा निर्णय घेतला होता.

रविवारी मीराबाग परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. आंदोलकांनी पणजीतील आझाद मैदानावर कूच करण्याची तयारी सुरू केली होती. संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले होते. मीराबाग पुलावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि आंदोलकांना गावाबाहेर पडण्यापासून रोखण्यात आले. काही ठिकाणी घोषणाबाजी परिस्थिती आणखी आणि रस्ता अडवण्याच्या घटना घडल्याने चिघळली होती. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट शब्दांत मिराबाग येथे कोणत्याही परिस्थितीत बंधारा उभारला जाणार नसल्याची ग्वाही दिली.

लेखी पत्र देण्याचे आश्वासन

'बंधारा तसेच पंप स्टेशन येणार नाही. मुख्यमंत्री म्हणून मी याची जबाबदारी घेतो,' असे त्यांनी सांगितले. सुरुवातीला लेखी हमीची आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटले होते; मात्र नंतर मडगाव येथे झालेल्या बैठकीत दोन दिवसांत लेखी स्वरूपात बंधारा रद्द केल्याचे पत्र देण्याचे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT