पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तसेच केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात शनिवारी त्यांनी नितीन नबीन यांची भेट घेऊन गोव्यातील राजकीय परिस्थिती, दुहेरी इंजिन सरकारच्या माध्यमातून सुरू असलेले विकास प्रकल्प, पक्ष संघटन बळकटीकरण आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.
शुक्रवारी डॉ. सावंत यांनी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. गोव्यातील वाळू उत्खननासाठी शाश्वत आणि नियमनबद्ध आराखडा तयार करण्यासह विविध पर्यावरणीय विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राज्यात वाळू उत्खननावर असलेल्या बंदीमुळे बांधकाम क्षेत्रावर परिणाम होत असून बाहेरील राज्यांतून महागडी वाळू आणावी लागत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यादव यांना दिली. याशिवाय राज्याशी संबंधित इतर विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
दिल्लीतून आभासी बैठकीचे अध्यक्षस्थान
'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान'च्या राज्यस्तरीय शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी गोव्यात बैठक झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीतून या बैठकीचे आभासी अध्यक्षस्थान भूषवले. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक समन्वय, नियोजन आणि तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. गोवा सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांचे प्रमुख या बैठकीला गोव्यातून उपस्थित होते.