पणजी : Pramod Sawant | गोव्यात कोकणी एवढेच मराठीचे स्थान आहे. कोकणी राजभाषेबरोबरच मराठीही गोव्याची सहभाषा आहे. मराठीवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही. फक्त बाहेरील लोक सरकारी नोकरीत घुसू नयेत यासाठी सरकारी कर्मचारी भरतीमध्ये कोकणीची सक्ती केली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. आज साखळी येथील रविंद्र भवनात गोवा मराठी अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सृजनसंगम युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, उपाध्यक्ष चंद्रकांत गावस, प्रा. पौर्णिमा केरकर, परेश प्रभू आदी उपस्थित होते. गोव्यात परप्रांतियांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गोमंतकीयांना रोजगारात संधी मिळावी म्हणून आपल्या सरकारने काही निर्णय घेतले, परंतु गोव्याला मराठीची मोठी परंपरा असून मराठीत शिक्षण घेणाऱ्यांवर किंवा मराठी भाषेवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले. सुमारे २०० युवांनी दिवसभर आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. तसेच कला सादरीकरण केले.