पणजी : पुढारी वृत्तसेवा
पाळी येथील लोहखनिज डंप हाताळणीच्या कामाला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यंत्रांची पूजा करून खाण कामाला सुरुवात केली. यावेळी चौगुले खाण कंपनीचे अधिकारी, तसेच खाण खात्याचे अधिकारी उपस्थित होते. गोव्याच्या खाण क्षेत्रासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे यावेळी डॉ. सावंत यांनी नमूद केले.
डॉ. सावंत म्हणाले की, गोवा लोहखनिज डंप हाताळणी नियमन धोरण, २०२३ अंतर्गत कार्यान्वित होणारा पहिला डंप असलेल्या पाळी येथील लोहखनिज डंपवर चौगुले कंपनीचे कामकाज सुरू झाले आहे. पूर्वीच्या खाणकामातून डंपमध्ये पडून असलेल्या खनिज संसाधनांचा जबाबदारीने वापर करण्यासाठी एका पारदर्शक आणि नियमबद्ध चौकटीची ही अंमलबजावणी आहे.
या उपक्रमामुळे आर्थिक उलाढाल वाढेल, रोजगार निर्माण होईल, स्थानिक व्यवसायांना पाठिंबा मिळेल आणि राज्याच्या महसुलात भर पडेल, तसेच पर्यावरणीय आणि वैधानिक सुरक्षा उपायांचे काटेकोर पालन सुनिश्चित केले जाईल.
सांखळी विधानसभा मतदारसंघातील पाळी येथे हे काम सुरू झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्थानिक नागरिक, कंपनी आणि संबंधित घटकांनी संवादातून प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले. स्थानिकांच्या हिताचा विचार करूनच खाण वाहतुकीशी संबंधित निर्णय घेतले जातील.
परिसरातील रोजगाराच्या संधी आणि विकासालाही प्राधान्य दिले पाहिजे. स्थानिक हित, रोजगार आणि विकास यांचा समतोल राखून खाण वाहतूक सुरू राहावी, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. पाळीतील या खनिज डंपमधून सुरू झालेली वाहतूक गोव्यातील खाजगी खनिज डंप धोरणाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.