पणजी : पुढारी वृत्तसेवा
विरोधकांकडून विशेषतः काँग्रेसकडून संसदीय लोकशाही विस्कळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकार देशासाठी घातक असून, तो निषेधार्थ आहे. तो सहन केला जाणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
विरोधी पक्षाकडून अराजकता पसरवून लोकशाहीचे हनन करण्याचा प्रकाराचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पणजीत मंगळवारी काढलेल्या लोकतंत्र बचाव पदयात्रेनंतर आझाद मैदानवर झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्य मंत्री विश्वजित राणे, पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्यासह अन्य मंत्री, आमदार, भाजप नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, लोकशाहीत सरकारला विरोध करणे कायदेशीर आहे.
परंतु तो विरोध विधायक असावा. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष देशाच्या लोकशाहीचा पाया कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. दामू नाईक यांनी सांगितले की, काँग्रेसच्या राजवटीत एसआयआर बारा वेळा झाला होता. भाजपच्या कार्यकाळात तो फक्त दोनदा झाला. मात्र एसआयआर मुद्द्याचा वापर करून विरोधक वोट चोरीच्या घोषणा देत आहेत. हे निषेधार्ह आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, काँग्रेस पक्षावर लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी एसआयआर मुद्द्याचा वापर करत आहे, असा आरोप केला. बाहेरील आणि आतील शक्ती भारताच्या लोकशाहीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मत आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केले. इतर मंत्री व आमदारांनीही जोरदार मते व्यक्त करत काँग्रेस व त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली. पणजीतील चर्च चौक ते आझाद मैदान अशी ही पदयात्रा काढण्यात आली.