Goa CM Pramod Sawant 
गोवा

Goa CM Dr. Pramod Sawant 7 Years | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आज सात वर्षे पूर्ण

१९ मार्च २०१९ मध्ये पहिल्यांदा शपथ; २०२२ मध्ये बनवले पुन्हा सरकार

पुढारी वृत्तसेवा

पणजी : मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले डॉ. प्रमोद सावंत गुरुवारी, १९ मार्च रोजी ७ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. १९ मार्च २०१९ रोजी त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतरही तेच राज्याचे मुख्यमंत्री बनले.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची मंगळवारी पुण्यतिथी होती. मनोहर पर्रीकर यांचे १७ मार्च २०१९ रोजी निधन झाल्यानंतर १९ मार्च २०१९ रोजी डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते विधानसभेचे सभापती होते. राज्यात सर्वाधिक काळ भाजप सरकारचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा विक्रम डॉ. प्रमोद सावंत यांनी निर्माण केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिलेल्या डॉ. प्रमोद सावंत यांची राजकीय कारकीर्द भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदापासून सुरू झाली. आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून त्यांनी भामई-पाळी येथे प्रॅक्टिसही केली आहे. त्यानंतर त्यांनी काहीकाळ साखळी आरोग्य केंद्रातील सरकारी नोकरी सोडून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

पाळी मतदारसंघाचे तत्कालीन काँग्रेस आमदार गुरुदास गावस यांच्या आकस्मिक निधनामुळे तिथे पोटनिवडणूक झाली होती. नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या या पोटनिवडणुकीत डॉ. प्रमोद सावंत भाजपचे उमेदवार होते, मात्र काँग्रेसच्या प्रताप गावस यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानेच त्यांच्या राजकीय प्रवासाची खरी सुरुवात झाली.

पाळी मतदारसंघातून पहिल्यांदा विजयी

साखळी (पूर्वीचा पाळी) मतदारसंघातून २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. प्रमोद सावंत पहिल्यांदा विजयी झाले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून आले. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर ते सभापती झाले. सभापती असतानाच पर्रीकर यांच्या निधनामुळे त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखाली २०२२ ची विधानसभा निवडणूक होऊन भाजपला २० जागा मिळाल्या. तीन अपक्षांच्या मदतीने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुन्हा भाजपचे सरकार बनवले. गुरुवारी ते मुख्यमंत्रीपदाची सात वर्षे पूर्ण करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT