आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध 
गोवा

Goa News : आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध

मुख्यमंत्री : साखळी येथे जनजातीय गौरव वर्षानिमित्त कार्यक्रम

पुढारी वृत्तसेवा

वाळपई : आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी भाजप सरकारने सदैव पुढाकार घेतला आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणाऱ्या हजारो अज्ञात वीरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळख आणि सन्मान दिला आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन युवकांनी विकसित भारत घडविण्याच्या ध्येयासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

भारताच्या आदिवासी समाजाच्या अभिमानाचे प्रतीक आणि क्रांतिकारी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन, साखळी येथे जनजातीय गौरव वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आदिवासी कल्याण, क्रीडा आणि युवा व्यवहार तसेच कला आणि संस्कृतीमंत्री डॉ. रमेश तवडकर,आमदार प्रेमेंद्र शेट, जि. पं. सदस्य गोपाळ सुर्लकर, महेश सावंत, रवींद्र भवन साखळीचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, आदिवासी कल्याण खात्याचे संचालक नीलेश डायगोडकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, गोव्यातील आदिवासी समाजाला संविधानिक दर्जा देण्याचे श्रेय भाजप सरकारला जाते. मात्र दर्जा मिळूनही अनेक हक्क व योजनांचा लाभ या समाजाला मिळत नव्हता. 2012 मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेत आले. त्यात आदिवासी खात्याचे मंत्री म्हणून डॉ. रमेश तवडकर यांनी राबविलेल्या योजनांमुळे आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. आमचे सरकार फक्त ‌‘अंत्योदय तत्त्व‌’ सांगत नाही, तर ते कृतीतून सिद्ध करत असल्याचे ते म्हणाले.

आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले, भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या अल्पायुष्यात आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी ज्या धाडसाने आणि निर्धाराने लढा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर सरदार वल्लभभाई पटेल, अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या राष्ट्रपुरुषांच्या कार्याची जनजागृती केली. त्याचप्रमाणे भगवान बिरसा मुंडा या आदिवासी समाजातील प्रेरणादायी युवा नेतृत्वाची ओळख संपूर्ण देशाला करून देण्याचा प्रयत्न आज होत आहे. त्यामुळेच दरवर्षी 15 नोव्हेंबर ‌‘जनजातीय गौरव दिन‌’ म्हणून साजरा केला जातो, अशे ते म्हणाले.

आत्मसन्मानाचा नवा अध्याय मंत्री तवडकर

मंत्री रमेश तवडकर म्हणाले, केवळ २५ वर्षांच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध धैयनि लढा देत 'धरती आबा' आणि 'भगवान' अशी उपाधी मिळवली. त्यांनी भूमी, जंगल, पाणी आणि धर्मांतर यांसारख्या प्रश्नांवर आंदोलन छेडले. त्यांच्या कार्यातूनच आदिवासी समाजाच्या आत्मसन्मानाचा नवा अध्याय लिहिला गेला. गोव्यात दरवर्षी साजरा होणाऱ्या जनजातीय गौरव दिन कार्यक्रमाची नोंद आज राष्ट्रीय स्तरावर होत आहे, हे राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन सिद्धी उपाध्याय यांनी, तर गोपाळ सुर्लकर यांनी आभार मानले. ग्रावेली सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT