CM Pramod Sawant 
गोवा

Goa Harit Goa Swachh Campaign | प्लास्टिक, कचरामुक्त गावांना मिळणार पुरस्कार

Goa Harit Goa Swachh Campaign | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : 19 डिसेंबरला होणार वितरण

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

20 सरकारतर्फे राज्यातील सर्व महसुली गावांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. प्लास्टिक, कचरा मुक्त तसेच स्वच्छतेचे अन्य निकष पूर्ण करणाऱ्या गावाला मोठ्या रकमेचा पुरस्कार देण्यात येईल. १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी शनिवारी ऑनलाईन पद्धतीने राज्यातील पंच, सरपंचासह स्वयंपूर्ण मित्रांसोबत संवाद साधला यावेळी त्यांनी राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या 'हरित गोवा स्वच्छ गोवा' उपक्रमाची माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी म्हणाले, गोव्यामध्ये रस्त्याच्या बाजूला हरित कॉरिडॉर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी पत्रादेवी ते पोळे पर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला झाडे लावण्यात येणार आहेत. पुढील तीन महिन्यात १० लाख झाडे लावण्यात येतील. रस्त्याच्या बाजूला शेती करणाऱ्यांनी आपल्या शेतात झाडे लावावीत.

या झाडांची मालकी पूर्णपणे शेतकऱ्याची असेल. पंचायत, नगरपालिका, शाळा, महाविद्यालयांनी आपल्या आवारात वृक्षारोपण मोहिमा राबवाव्यात. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, झाडे लावल्यानंतर त्याची देखभाल व पाणी घालण्याचे काम सरकारतर्फे केले जाईल. महिला बचत गटांनी हे काम हाती घेतल्यास त्यांना वेतन दिले जाईल. तीन महिन्यानंतर या उपक्रमात चांगले काम केलेल्या पंचायत तसेच अन्य संस्थांना पारितोषिक दिले जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

भाड्याच्या जागांवर कचरा कर लावा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाजवळ कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पंचायतींसह अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कचऱ्याची विल्हेवाट केवळ निर्धारित कचरा टाकण्याच्या ठिकाणीच लावली पाहिजे. बहुतांश कचरा भाड्याच्या जागांमधून निर्माण होत आहे. त्यांनी पंचायतींना अशा जागांवर स्वतंत्र कचरा कर लावण्याचे आणि तेथून नियमित कचरा संकलनासाठी योग्य व्यवस्था करण्याचे आवाहन केले.

रस्त्याकडेला स्टॉल नको

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी महामार्गावरील रस्त्याच्या कडेला स्टॉल्स लावणे टाळण्याचे आवाहन केले. या स्टॉलवर वाहने थांबल्याने आणि मागून येणाऱ्या दुचाकींची धडक बसल्याने अनेकदा अपघात होतात. त्यामुळे कधीकधी जीवितहानीही होते. अशी अतिक्रमणे असुरक्षित असून महामार्गांच्या सौंदर्यावर नकारात्मक परिणाम करतात, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT