Census Pudhari
गोवा

Goa Census 2026 | गोव्यात 1 डिसेंबरपासून जनगणना; नागरिकांना विचारले जाणार 'हे' 40 प्रश्न!

Goa Census 2026 | 2011 पेक्षा 10 अतिरिक्त प्रश्न! जनगणनेत आधार, बँक खाती आणि कोविड लसीकरणाची नोंद

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय गृह खात्याने जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोवा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये १ डिसेंबर २०२६ ते ४ जानेवारी २०२७ या कालावधीत जनगणना होणार आहे. त्यानंतर ५ ते ९ जानेवारी २०२७ दरम्यान पुनर्तपासणी फेरी राबविण्यात येईल.

२०२७ च्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांना ४० प्रश्न विचारले जाणार आहेत. २०११ च्या जनगणनेच्या तुलनेत यावेळी १० अतिरिक्त प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. नाव, लिंग, वय यासह राष्ट्रीयत्व, बँक खात्यांची संख्या, कोविड लस घेतल्याची जागा, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, पासपोर्ट क्रमांक, मतदार ओळखपत्र आणि आई-वडिलांची माहिती घेतली जाणार आहे. गोव्यात नागरिकांना १६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन स्वयं नोंदणीचा (सेल्फ एन्युमरेशन) पर्याय उपलब्ध असेल.

दुसऱ्या टप्प्यात कुटुंबप्रमुखाशी नाते, वैवाहिक स्थिती, लग्नावळचे वय, जोडीदाराचे नाव, धर्म, जात, दिव्यांगत्व, मातृभाषा, अन्य भाषा, साक्षरता व डिजिटल साक्षरता यांची माहिती घेतली जाईल. शिक्षण, रोजगार, व्यवसाय, जन्मस्थान, स्थलांतराचे कारण, कायमचा पत्ता आणि वाहन परवान्यासंबंधी माहितीही घेतली जाणार आहे. विवाहित, विधवा किंवा घटस्फोटित महिलांना जिवंत अपत्यांची माहिती देणे बंधनकारक असेल.

गोव्यातील जनगणनेचे वेळापत्रक

  • १६ ते ३० नोव्हेंबर २०२६ : स्वयं नोंदणी

  • १ डिसेंबर २०२६ ते ४ जानेवारी २०२७ : प्रत्यक्ष जनगणना

  • ५ ते ९ जानेवारी २०२७ : पुनर्तपासणी फेरी

जनगणनेमुळे नगरपालिका निवडणुका लांबणार?

जनगणनेचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे नगरपालिका निवडणुकांबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळवण्यासाठी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. डिसेंबरमध्ये जनगणना सुरू होऊन जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंत नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांनंतर नगरपालिका निवडणुका घेण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली जाण्याची शक्यता आहे. जनगणनेचे वेळापत्रक आणि नगरपालिका निवडणुकांची निर्धारित मुदत यांच्यातील कालावधी पाहता, या निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT