Goa Statehood Day 2025
30 मे 1987 रोजी गोव्याला अधिकृतपणे घटकराज्याचा दर्जा देण्यात आला आणि ते भारताचे 25 वे राज्य बनले. त्या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी 30 मे रोजी गोवा घटकराज्य दिन साजरा केला जातो. हा महत्त्वाचा प्रसंग गोव्याला भारतीय संघराज्यातील एक वेगळे राज्य म्हणून मान्यता देतो. पूर्वी तो दमण व दीव सोबत एक केंद्रशासित प्रदेश होता.
गोव्याला समृद्ध आणि वैविध्यपूर्ण इतिहास आहे. चार शतकांहून अधिक काळ पोर्तुगीज वसाहतवादामुळे तो ब्रिटिश अमलाखाली असलेल्या इतर भारतातील राज्यांपेक्षा वेगळा आहे.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला तरी गोव्याला मुक्तीसाठी 19 डिसेंबर 1961 पर्यंत वाट पाहावी लागले. या दिवशी ऑपरेशन विजयद्वारे हे राज्य पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त झाले आणि त्यानंतर दमण आणि दीवसह केंद्रशासित प्रदेश बनले. वेगळी ओळख आणि स्वायत्ततेच्या वर्षानुवर्षांच्या मागणीनंतर अखेर 30 मे 1987 रोजी गोव्याला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला.
गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला खरा पण गेल्या 38 वर्षांत राज्याने नेमके काय कमावले आणि काय गमावले याचा हिशोब मांडणेही सयुक्तिक ठरेल.
14 वर्षांनंतर उशिराने मिळालेले स्वातंत्र्य, नंतर विलीनीकरणातून सुटका करणारा जनमत कौल आणि त्यानंतर पुन्हा वारंवारच्या मागणीनंतर मिळालेले घटकराज्य. घटकराज्याचा दर्जा मिळाल्यापासून, गोव्याने विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे.
गोव्यान आपले स्वतंत्र अस्तित्व राखतानाच आर्थिक आघाडीवर भरारी घेतली आहे. गोव्याचे दरडोई उत्पन्न आणि सकल राज्य देशांतर्गत उत्पादन इतर राज्यांच्या तुलनेत खूप वरचे आहे. खाण व पर्यटन उद्योग हा राज्याचा आर्थिक कणा मानला जातो. मात्र गेली 12-13 वर्षे खाण उद्योग बंद असूनही राज्याने आर्थिक शिस्तीच्या बळावर चांगली झेप घेतली आहे. पर्यटन उद्योग हा आजही महत्त्वाचा आहे. गेल्या 38 वर्षांत राज्याच्या पर्यटनाचा चेहराही बदलला आहे. पूर्वी केवळ ऑक्टोबर ते मे असा असणारा पर्यटन हंगाम आता बारमाही खुला झाला आहे. समुद्रकिनारे, मंदिरे याच्या जोडीला आता वर्षा पर्यटन, साहसी पर्यटन, हिंटरलँड पर्यटनाची जोड देण्यात आपल्याला यश आले आहे. 16 लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात या संख्येच्या किती तरी पट अधिक पर्यटक भेट देत असतात. पुढील काही वर्षांची गरज लक्षात घेऊन आता दाबोळी बरोबरच मोपा विमानतळही उभारण्यात आला आहे. रस्त्यांचे जाळेही वाढवण्यात आले आहे.
गोव्याने गेल्या काही वर्षांत अनेक क्षेत्रात यश मिळवले आहे. 2019 साली उघड्यावर शौच मुक्त होणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. गोवा हे देशातील पहिले हर घर जल प्रमाणित राज्य बनले आहे. 100 टक्के घरांना वीजपुरवठा करण्यातही राज्याने यश मिळवले आहे. आज घटकराज्य दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोवा 100 टक्के साक्षर झाल्याची घोषणा करणार आहेत.
पायाभूत साधनसुविधा विकासात राज्याने नेत्रोद्दिपक यश मिळवले आहे. पत्रादेवी ते पोळे मार्गाचे चौपदरीकरण, आवश्यक त्या ठिकाणी पूल, फ्लायओव्हरचे बांधकाम केले आहे. झुआरी नदीवर चार पदरी पूल बांधला असून त्याची तुलना जगातील कोणत्याही अत्याधुनिक पुलाशी करता येते. परवाच केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत निगराणी मनोर्याचे उद्घाटन करण्यात आले. दोन दोन विमानतळ त्याला शेजारच्या राज्याशी असलेली रस्ता मार्गाची कनेक्टिविटी यामुळे राज्याला लाभ होत आहे. त्याचा पर्यटनालाही नजीकच्या काळात मोठा लाभ होणार आहे.
फळे आणि भाजीबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटकवर अवलंबून असलेल्या गोव्याने गेल्या काही वर्षांत बर्यापैकी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली आहे. पाच सहा भाज्यांबाबत राज्य स्वयंपूर्ण झाल्याची घोषणा अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
शेतीकडेही सरकार विशेष लक्ष देत असून भात, काजू आणि नारळ यासारख्या पिकांवर सरकारचा भर आहे. काजू व नारळाला आधारभूत किंमत देत शेतकर्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे. मयंडोळची केळी, मानकुराद आंबा आणि कोरगुट तांदूळ यासारख्या पिकांनाही सरकार प्रोत्साहन देते.
अनेक क्षेत्रांत आणि बाबतीत राज्याचे अगदी छान चित्र रेखाटता येते. पण राज्यासमोर काही आव्हानेही आहेत. आर्थिक विकास आणि पर्यावरणीय शाश्वतता यांचा समतोल साधण्याची आवश्यकता आहे. विशेषतः पर्यटन आणि खाण क्षेत्रात. पर्यटनात स्थानिकाचा टक्का टिकून राहील हे पाहिले पाहिजे. शॅकवाले, टॅक्सीवाले किंवा या क्षेत्राशी संबंधित इतर छोटे घटक हे गोव्याच्या प्रतिमेचे दूत आहेत. आतिथ्य उद्योगातील आवश्यक कौशल्यांबाबत त्यांना अद्यावत करण्याची गरज आहे.
पायाभूत सुविधांमध्ये राज्याने बर्यापैकी झेप घेतली असली तरी राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि लोकसंख्येला आधार देण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सतत गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
गोव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाचे लोकांना वेगळे आकर्षण आहे. गोव्याचा अद्वितीय सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक रचनेचे जतन करताना त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
गोवा घटकराज्य दिन हा आनंद आणि उत्साहाचाच दिवस आहे. या दिवशी या राज्याला एक नवीन जन्म मिळाला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यानिमित्ताने राज्यात सरकारी पातळीवर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. राज्याच्या समृद्ध बहुआयामी संस्कृतीचाही तो उत्सव असतो. एक युरोपीय वसाहत ते भारतीय संघराज्यातील समृद्ध राज्य म्हणून झालेला कायापालट याचाही तो उत्सव आहे. येथील स्वतंत्र अस्मिता आणि स्वायत्ततेचा राज्याला अभिमान आहे. त्या बळावरच गोवा राज्य नवनवीन शिखरे पादाक्रांत करत देशभरात आपला डंका वाजवत आहे.