पणजी : राज्यात कॅन्सर रुग्णाची संख्या वाढत आहे. गेल्या सहा वर्षांच्या आकडेवारीनुसार ही संख्या वाढ स्पष्ट झाली आहे. पाच वर्षांत गोवा वैद्यकीय महाविद्यालयात 1540 कॅन्सर रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
खासगी इस्पितळांत मरण आलेल्यांची संख्या वेगळी आहे. त्यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य खाते आणि दंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात मोफत कर्करोग तपासणी अभियान सुरू केले आहे. कॅन्सरच्या सर्व तपासण्यांची सुविधा असलेली बस राज्यातील विविध भागांत फिरून तपासणी करत आहे.
या अभियानात मे 2025 पर्यंत 4 हजार जणांची तपासणी केली गेली. त्यात 150 व्यक्तींना कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आढळून आली. तर 20 जणांना कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वांवर उपचार सुरू झाले आहेत. 16 ठिकाणी ही तपासणी करण्यात आली. आरोग्य खात्याच्या अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, मोफत कर्करोग तपासणी अभियान अनेकांसाठी वरदान ठरत आहे. याद्वारे फिरत्या कर्करोग निदान वाहनाच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी केली जात आहे.
गोमेकॉ कम्युनिटी विभागाचे प्रमुख तसेच अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. जगदीश काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंडूर, वाळपई, साखळी, कुडचडे, हळदोणे, जुने गोवे, काणकोण, सांगे, डिचोली, पेडणे, शिरोडा, कासावली, नुवे, बाणावली आदी ठिकाणी फिरत्या वाहनांद्वरे तपासणी करण्यात आली आहे.