पणजी :गोवा राज्यातील तिरमला तिरुपती मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेला नव्या १३ शाखा सुरू करण्यास दिलेली परवानगी तथा हरकत प्रमाणपत्र (एनओसी) तत्काळ प्रभावाने मागे घेण्यात आल्याचा आदेश राज्य सहकार निबंधक आशुतोष आपटे यांनी जारी केला आहे.
या एनओसीच्या आधारे संस्थेला गोव्यात आपले कार्यक्षेत्र वाढविण्याची तसेच १३ शाखा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, सदर परवानगी आता रद्द करण्यात आली असून, त्यानुसार संबंधित संस्थेला गोव्यात नवीन शाखा सुरू करता येणार नाहीत. सहकारी संस्था निबंधक कार्यालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, हा निर्णय तत्काळ अंमलात येणार असून, सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहकारी संस्था निबंधक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या तपासणी. व त्यानंतरच्या कारवाईदरम्यान संबंधित संस्थेकडून कायदेशीर व नियामक नियमांचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचे उघड झाले. मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट २००२ तसेच केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांनी जारी केलेल्या परिपत्रकांचे पालन करण्यात संस्थेला अपयश आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
गंभीर बाबी समोर
तपासणी अहवालानुसार, कायद्यानुसार आवश्यक असलेले लेखापरीक्षित आर्थिक अहवाल सादर न करणे, वैधानिक तपासणी व पडताळणी प्रक्रियेत सहकार्य न करणे, एनओसी देताना घालून दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करणे, तसेच नोटिसा बजावूनही सहकारी संस्था निबंधकांसमोर हजर न राहणे, या गंभीर बाबी समोर आल्या आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.