Goa Honey Trap Pudhari
गोवा

Goa Crime | कळंगुटमध्ये ‘हनीट्रॅप’चा प्रकार, दारू पाजून अभियंत्याला लुटल्याची तक्रार!

अभियंता तेलंगणातील, पर्यटकांना लक्ष्य करून लुटमारी करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

पणजी : कामाचा ताण हलका करण्यासाठी कळंगुट समुद्रकिनारी गेलेल्या तेलंगणातील एका अभियंत्याला दोन महिलांनी दारू पिण्यास भाग पाडून बेशुद्ध केले आणि त्याच्याकडील मौल्यवान वस्तू लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कळंगुट परिसरात पर्यटकांना लक्ष्य करून लुटमारी करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश मुदापती हे मूळ तेलंगणातील असून ते म्हापसा येथे एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करतात. कामाचा ताण कमी करण्यासाठी ते रात्री साडेअकराच्या सुमारास कळंगुट समुद्रकिनारी गेले होते. तेथे एका महिलेने त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. काही वेळाने दुसरी महिला तेथे आली. तिच्याकडे बिअरच्या बाटल्या होत्या.

आकाश यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, दोन्ही महिलांनी त्यांना दारू पिण्यास भाग पाडले. काही घोट घेतल्यानंतर त्यांना तीव्र चक्कर, उलट्या आणि दिशाभ्रमाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर महिलांनी मदत करण्याच्या बहाण्याने त्यांना कळंगुट चर्चजवळील एका फ्लॅटमध्ये नेल्याचा आरोप त्यांनी केला.

पहाटे साडेचारच्या सुमारास शुद्धीवर आल्यानंतर मोबाईल फोन, होंडा ॲक्टिव्हा स्कूटर आणि रोख चार हजार रुपये गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कळंगुट पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

मात्र, सुरुवातीला पोलिसांनी केवळ हरविलेल्या वस्तूंची नोंद केली, असा दावा आकाश यांनी केला आहे. परिसरात अशा प्रकारचे संघटित प्रकार सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दारूमध्ये काही पदार्थ मिसळले होते का, महिलांनी पूर्वनियोजित पद्धतीने त्यांना लक्ष्य केले होते का आणि या प्रकारामागे टोळी कार्यरत आहे का, याचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT