पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे मंगळवारी रात्री सहकुटुंब दिल्लीला पोहोचले. दिल्लीत पोहोचल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील व संघाचे कार्यकर्ते पांडुरंग सावंत यांनी पंतप्रधानांना पुष्पगुच्छ प्रदान केला. दरम्यान, या भेटीत गोव्यातील राजकारणावर चर्चा झाली असून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी प्रा. सुलक्षणा सावंत आणि कन्या पार्थिवी सावंत उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री दिल्ली भेटीत गोवा मंत्रिमंडळातील रिक्त मंत्रिपदे लवकरच भरण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक आहेत. माजी मंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे एक मंत्रिपद रिक्त आहे. त्यामुळे दिल्ली दौऱ्यात त्याचा अंतिम निर्णय करून सुरू असलेल्या चर्चाना मुख्यमंत्री पूर्णविराम देण्याची शक्यता आहे.
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना डॉ. सावंत यांनी संभाव्य दावेदारांविषयी किंवा पद भरण्याच्या नेमक्या कालावधीबद्दल कोणताही तपशील उघड करण्यास नकार दिला. नवीन मंत्र्यांच्या नियुक्त्तीबाबत अंतिम निर्णय झाल्यावर माध्यमांना कळवले जाईल, इतकेच ते म्हणाले. सध्याच्या मंत्रिमंडळात महिला मंत्री नसल्याने डिलायला लोबो यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री दिल्ली भेटीत आदिवासी समाजाला (एसटी) राजकीय आरक्षण २०२७ च्या निवडणुकीत देण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढण्याबाबतही केंद्रीय नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी, उमेदवारी ठरवताना विद्यमान आमदारांतील कुणाला वगळावे, यावरही चर्चा होणार असल्याचे कळते.
अमित शहा, गडकरी यांची घेतली भेट
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच रस्ता वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. अमित शहा यांच्या सोबतच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी एसटी आरक्षण आणि मंत्रिमंडळात नव्या मंत्र्यांचा समावेश यावर चर्चा केल्याचे वृत्त आहे, तर गडकरी यांच्या सोबतच्या बैठकीत गोव्यात सुरू असलेल्या रस्ते, उड्डाणपूल यांच्या कामाबद्दल चर्चा केल्याचे कळते