पणजी : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प २०२६२७ हा व्यवहार्य, लोकाभिमुख आणि गोव्याच्या विकासाला नवी दिशा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी, गोवा प्रदेशचे अध्यक्ष दामोदर दाम् नाईक यांनी व्यक्त करत केंद्र सरकारचे अभिनंदन केले. नाईक म्हणाले की, काजू व नारळ हे गोव्याच्या ओळखीशी आणि पारंपरिक उपजीविकेशी घट्ट जोडलेले घटक असून अर्थसंकल्पात या दोन्ही पिकांवर विशेष भर देण्यात आला आहे. गोवा म्हटले की सर्वत्र नारळाची झाडे दिसतात आणि काजूचे नाव घेताच गोव्याची आठवण येते. ही पिके गोव्याच्या वारशाचा भाग असून अनेक पिढ्यांना उपजीविका देत आली आहेत, असे त्यांनी सांगितले. काजू व नारळासाठी एआय आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमीन नकाशांकन, उत्पादनवाढ आणि शास्त्रीय नियोजनावर दिलेला भर हा योग्यवेळी घेतलेला निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन, कमी नुकसान आणि उत्पन्नवाढ होईल, असे ते म्हणाले. काजू शेती आणि प्रक्रिया क्षेत्राला चालना देण्यासाठी उच्च मूल्य शेती आणि काजूसाठी स्वतंत्र कार्यक्रमाची घोषणा महत्त्वाची आहे. २०३० पर्यंत भारतीय काजूला जागतिक प्रीमियम ब्रँड बनवण्याची दृष्टी गोव्यातील शेतकरी, कामगार आणि लघुउद्योजकांसाठी लाभदायक ठरेल, तसेच आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, असे ते म्हणाले. नारळाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी जुनी व उत्पादनक्षमता कमी झालेली झाडे ही मोठी समस्या आहे. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नारळ प्रोत्साहन योजनेमुळे जुन्या झाडांची जागा अधिक उत्पादन देणाऱ्या जातींनी घेतली जाईल, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल, अर्थसंकल्पातील राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या उपक्रमांचाही उल्लेख केला. पायाभूत सुविधांसाठी भांडवली खर्च १२.२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला असून, दुर्मिळ खनिजे, सेमीकंडक्टर मिशन २.० आणि 'बायोफार्मा शक्ती' योजनेमुळे देशाची तंत्रज्ञान व औद्योगिक क्षमता वाढेल, असे त्यांनी सांगितले. ब्लू रिव्होल्यूशन आणि मत्स्य संपदा योजनेला दिलेल्या महत्त्वाबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, मासेमारी हा गोव्याचा पारंपरिक व्यवसाय असून या योजनांमुळे मच्छीमार समाजाचे उत्पन्न वाढेल आणि पायाभूत सुविधा सुधारतील. पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे नमूद करत त्यांनी हॉस्पिटॅलिटी, कॉलेजेस, प्रशिक्षण केंद्रे आणि १० हजार पर्यटन मार्गदर्शकांच्या प्रशिक्षणाच्या घोषणेचे स्वागत केले. यामुळे गोव्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले. एसएमई आणि एमएसएमईसाठी जाहीर केलेल्या १० हजार कोटींच्या एसएमई वाढीव फंडासह महिलांसाठी लखपती दीदी योजना, 'शी मार्ट्स' आणि प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहे या घोषणा महिला सक्षमीकरणाला नवी चालना देतील, असेही नाईक यांनी सांगितले. हा अर्थसंकल्प केवळ उत्पन्न सहाय्यापुरता मर्यादित नसून महिलांच्या खऱ्या आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा करणारा आहे. पारंपरिक क्षेत्रांचे संरक्षण करताना नवे रोजगार आणि विकासाच्या संधी निर्माण करणारा हा अर्थसंकल्प गोव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉइंट ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली हा अर्थसंकल्प काजू व नारळ क्षेत्रासाठी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आशेचा किरण ठरेल असे मत नाईक यांनी व्यक्त केले.