पणजी : पुढारी वृत्तसेवा
लोककला, साहित्य आणि विचारपरंपरेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेला बळ देण्याचे कार्य वाचनसंस्कृती करते. विविध भाषांतील, संस्कृतींतील आणि विचारप्रवाहांतील साहित्य एकत्र आणून समाजात संवाद आणि समरसता निर्माण करण्याचे सामर्थ्य पुस्तकांमध्ये आहे, असे प्रतिपादन कला व संस्कृती खात्याचे मंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी केले.
सदर पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन गोवा सरकारच्या कला व संस्कृती संचालनालयाच्या वतीने, 'एक भारत श्रेष्ठ भारत' या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत, कृष्णदास शामा गोवा राज्य केंद्रीय ग्रंथालयात करण्यात आले आहे.
लोकत्सव २०२५ अंतर्गत पणजी येथील कला अकादमी परिसरात आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री डॉ. तवडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक विवेक नाईक, उपसंचालक श्री मिलिंद माटे, जी. एफ. डी. सी.चे उपाध्यक्ष धाकू मडकईकर, तसेच इतर मान्यवर आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.
या प्रदर्शनात देशभरातील विविध राज्यांतील साहित्य, इतिहास, लोकसंस्कृती, चरित्रे, बालसाहित्य तसेच समकालीन विषयांवरील ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकास होतो, विचारांची व्यापकता वाढते आणि समाज अधिक सुसंस्कृत बनतो, असेही त्यांनी नमूद केले. लोकत्सव २०२५च्या पार्श्वभूमीवर आयोजित या पुस्तक प्रदर्शनाला नागरिक, विद्यार्थी, लेखक व साहित्यप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, गोव्याच्या सांस्कृतिक जीवनात या उपक्रमामुळे नवे वैचारिक योगदान मिळत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
वाचनाची गोडी निर्माण करावी तवडकर
डॉ. रमेश तवडकर यांनी सांगितले की, एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना केवळ घोषणात्मक नसून, विविधतेतील एकता प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देणारी आहे. विविध भाषांतील साहित्य एकाच व्यासपीठावर आणल्यामुळे वाचकांना भारताची सांस्कृतिक समृद्धी समजून घेता येते. युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी अशा प्रदर्शनांचा लाभ घेऊन वाचनाची गोडी निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.