पणजी : पुढारी वृत्तसेवा
दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ गोवा भाजपतर्फे बुधवारी पणजी येथील काँग्रेस कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी यावेळी राहुल गांधींवर टीका करताना सांगितले की, नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणांनंतर केंद्र सरकारने आवश्यक माहिती जाहीर करून नव्याने पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेतली. या प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.
असे असतानाही काही युवकांना पुढे करून संसदेकडे मोर्चा काढण्यात आला आणि पोलिसांशी धक्काबुक्की करण्यात आली. या आंदोलनामागे राहुल गांधी यांची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर करण्यात आलेले आंदोलनही निषेधार्थ भाजपने हा मोर्चा काढल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. या मोर्चात मच्छीमारमंत्री निळकंठ हळर्णकर, आमदार दिलायला लोबो, आमदार राजेश फळदेसाई, आमदार केदार नाईक, आमदार नीलेश काब्राल, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष तुषार केळकर आदी सहभागी झाले होते.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काँग्रेसवर युवकांना वारंवार भडकावून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. भाजपचे कार्यकर्ते संयम बाळगत आहेत; मात्र ते भडकले तर काँग्रेसला पळता भुई थोडी होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनाची पूर्वकल्पना पोलिसांना देण्यात आली नव्हती. मोर्चा अचानक निघाल्याने पोलिसांची काही काळ तारांबळ उडाली. भर पावसातही शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दयानंद बांदोडकर मार्गावर काही काळ घोषणाबाजीमुळे वातावरण तप्त झाले होते.