पणजी : पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीला तयार आहे. आमचा पक्ष सदैव लोकांच्या संपर्कात असतो. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने केलेल्या कामाच्या बळावर येत्या विधानसभा निवडणुकीत ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. मगो सोबतच्या युतीबाबत वरिष्ठ मगोशी चर्चा करून निर्णय घेतील, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांनी केले आहे.
शनिवारी माध्यमांशी बोलताना नाईक म्हणाले की, फोंड्यातील राजकीय परिस्थिती, भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आणि मगो पक्षाने या जागेवर केलेल्या दाव्याबाबत भाष्य केले. भाजपचे वरिष्ठ मगो नेत्यासोबत चर्चा करून निर्णय घेतील, असेही नाईक यांनी फोंड्याच्या जागेवर मगोने केलेल्या दाव्याबाबत बोलताना सांगितले.
भाजप ही एक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करणारी संघटना
नाईक म्हणाले की, भाजप ही एक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करणारी संघटना आहे. पक्षाचे कार्यकर्ते तळागाळात एकजुटीने काम करत असल्याने फोंड्यामध्ये तसेच संपूर्ण गोव्यात पक्षाला सातत्याने यश मिळाले आहे.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने अनेक जनकल्याणाची निर्णय घेतले आहेत. जाहीरनाम्यातल्या आश्वासनांची पूर्तता करत उज्ज्वला गॅस सिलेंडर योजना, तसेच महिलांसाठीच्या विविध योजना तळागाळातील घटकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचवण्याचे काम सरकारने केले आहे.
विरोधी पक्षांकडून चुकीचे नरेटिव्हचा प्रचार
राजकारणात विरोधी पक्षांकडून विविध प्रकारच्या चर्चा आणि चुकीचे नरेटिव्ह पसरवले जात असले, तरी भाजप कार्यकर्त्यांचे कार्य अविरतपणे सुरूच आहे. असे सांगून त्यांनी स्पष्ट केले की, आजच्या राजकीय परिस्थितीत युती ही काळाची गरज आहे. युतीचे स्वतःचे काही विशिष्ट नियम आणि धर्म असतात.
त्यामुळे फोंडा जागेबाबत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व, राज्यातील वरिष्ठ नेते आणि घटक पक्षांचे प्रमुख एकत्र बसून योग्य तो मार्ग काढतील. सर्व प्रश्न समन्वयाने आणि सामंजस्याने सोडवले जातील, असे नाईक यांनी स्पष्ट केले.