पणजी : पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनता पक्षाचे नवे राज्य मुख्यालय चिंबल पंचायत क्षेत्रातील मेरशी-जुने गोवे बगल रस्त्यालगत उभारण्यात येत असून, या भव्य इमारतीचे उद्घाटन ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता. या चार मजली मुख्यालयाचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे.
भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. 'देश प्रथम' या विचाराने प्रेरित होऊन पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते काम करताना दिसतात, निःस्वार्थी कार्यकर्ते हेच पक्षाचे खरे बळ मानले जाते. त्यामुळेच गेली १२ वर्षे केंद्रात आणि १४ वर्षे गोव्यात भाजप सत्तेत आहे. देशातील अनेक राज्यांमध्येही मतदारांनी भाजपला सत्ता दिली आहे.
दिल्लीतील पक्षाचे भव्य मुख्यालय काही वर्षांपूर्वी उभारण्यात आले असून, त्याचे उद्घाटनहीं झाले आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये भाजपची स्वतःच्या मालकीची सुसज्ज मुख्यालये आहेत. याउलट, काँग्रेस पक्षाने गोव्यात अनेक वर्षे सत्ता उपभोगली. अनेक मुख्यमंत्री आणि मंत्री या पक्षाकडून झाले; मात्र पक्षाचे स्वतंत्र मुख्यालय उभारण्यासाठी ठोस प्रयत्न झाले नाहीत. आजही काँग्रेसचे गोवा मुख्यालय पणजीतील भाङघाच्या व अपुऱ्या जागेत आहे. तेथे मोठ्या प्रमाणात लोकांना सामावून घेणे अवघड जाते.
पत्रकार परिषदांदरम्यान पत्रकारांनाही पुरेशी जागा मिळत नाही. पावसाळ्यात इमारतीच्या काही भागांत गळतीची समस्याही उद्भवते. राज्यातील इतर अनेक पक्षांची कार्यालये स्वतःच्या जागेत असताना, दीर्घकाळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसकडे मात्र स्वतंत्र मुख्यालय नाही. भाजपचे सध्याचे पणजीतील मुख्यालयही पक्षाच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत आहे.
तेथे सुमारे ५० ते ७० लोक बसू शकतील असा पत्रकार कक्ष व बैठक कक्ष उपलब्ध आहे. तसेच अध्यक्ष, सरचिटणीस आणि उपाध्यक्षांसाठी स्वतंत्र केबिन्स आहेत. कर्मचाऱ्यांसाठीही स्वतंत्र कक्षांची व्यवस्था केली आहे. मात्र, राज्यभरात पक्षाचा वाढता विस्तार आणि मविष्यातील गरजा लक्षात घेऊन भाजपने चिंबल पंचायत क्षेत्रात महामार्गालगत भव्य मुख्यालय उभारण्याचा निर्णय घेतला.
नारंगी आणि पांढऱ्या रंगसंगतीने सजलेली ही आकर्षक इमारत दूरवरूनही लक्ष वेधून घेते. या चार मजली इमारतीत प्रशस्त सभागृह, बैठक कक्ष, अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन्स, कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन कक्ष तसेच दूरवरून येणाऱ्या नेते आणि कार्यकत्यांच्या निवासासाठी काही खोल्यांचीही व्यवस्था केली आहे.
डिसेंबर किंवा फेब्रुवारीमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेता, ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करून उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे. सध्या इमारतीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून सजावट, परिसर सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.
भाजपच्या नव्या गोवा मुख्यालय इमारतीचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. भव्य स्वरूपाच्या या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, ऑक्टोबरपर्यंत उद्घाटन होण्याची शक्यता आहे. मुख्यालयामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे.- दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप (गोवा)