मडगाव : पुढारी वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच कुडचडे मतदारसंघातील भाजपमधील अंतर्गत मतभेद प्रथमच उघडपणे समोर आले आहेत. सलग तीन वेळा कुडचडेचे प्रतिनिधित्व करणारे आमदार नीलेश काब्राल यांनी स्वपक्षातील काही नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप करत, विरोधकांनी राजकारण केले तर ते समजू शकतो; मात्र स्वपक्षातूनच माझे पाय ओढले जात असतील, तर त्याचे अधिक दुःख होते.
ज्याला आम्हीच पुढे आणले, त्यालाच आज माझ्याविरोधात उभे करून राजकीय डावपेच रचले जात आहेत, असे सांगत नाराजी व्यक्त केली. मी पक्षासाठी खूप त्याग केला आहे. मला तिकीट नाकारण्याचे काही कारण दिसत नाही, असल्यास पक्षाने ते जनतेसमोर स्पष्ट करावे, असा थेट इशाराही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला.
विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असतानाच कुडचडे मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेकांची नावे चर्चेत असताना काब्राल यांनी उघडपणे भूमिका मांडली. कथित प्रतिस्पर्धी रोहन गावस देसाई यांच्या माध्यमातून मतदारसंघात आपल्याविरोधात वातावरण तयार केले जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी केला. आज प्रत्येकाला भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवायची आहे. मात्र कोणालाही उमेदवारी देऊन निवडून आणता येते, असे नाही.
उमेदवारी ठरविताना स्थानिक वास्तवाचा विचार करण्याची गरज काब्राल यांनी व्यक्त केली. सासष्टी तालुक्याचा संदर्भ देताना त्यांनी काँग्रेसला अल्पसंख्याक मतांचा फायदा होत असल्याचा दावा केला. भाजपने प्रत्येक मतदारसंघाचा स्वतंत्र अभ्यास करूनच उमेदवार निश्चित करायला हवा, असे ते म्हणाले.
२०१२ च्या निवडणुकीत स्व. मनोहर पर्रीकर यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याची आठवण करून देत, आजची राजकीय परिस्थिती वेगळी असल्याचे नमूद केले भाजपनेच आपल्याला राजकीय ओळख दिली असून वरिष्ठांच्या आदेशानुसार काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना सामावून घेण्यासाठी मंत्रिपदाचाही त्याग केला. पर्रीकर यांच्यासाठी कुडचडे मतदारसंघ सोडण्याची तयारीही दाखवली होती.
मी पक्षविरोधी एकही काम केलेले नाही. मतदारसंघातील जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे भाजपची उमेदवारी मलाच मिळेल, याची खात्री आहे. काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चाना पूर्णविराम देत त्यांनी आपण पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी आपला सातत्याने संपर्क असून त्यांनी काम सुरू ठेवण्याचा सल्ला दिल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा मतदारांवर प्रभाव असल्याचे नमूद करत, पुढील सहा महिन्यांत राजकीय घडामोडी वेगाने बदलू शकतात, असेही ते म्हणाले. रोहन गावस देसाई यांच्याविषयी बोलताना काब्राल म्हणाले, रोहन पूर्वी आमच्यासोबतच होते. उद्योग-व्यवसायातून लोक मोठे होतात; पण त्यांचा व्यवसाय काय होता आणि आज ते कोणाच्या बळावर पुढे गेले, हे मतदारांना माहिती आहे. त्याबद्दल मला अधिक बोलायचे नाही.
अंतिम निर्णय जनता घेणार आहे. विधानसभा निवडणुकीत २७ आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले असले, तरी विद्यमाना आमदारांच्या मतदारसंघातच गटबाजी वाढू लागल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. पक्षाने सर्वेक्षण करून विद्यमाना आमदार कुठे कमी पडले, हे स्पष्ट करावे. अन्यथा विनाकारण गटबाजी वाढेल, असा इशारा देतानाच २०१७मध्ये काणकोणमध्ये रमेश तवडकर यांना उमेदवारी नाकारल्यानंतर निर्माणा झालेल्या परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पक्षाने वेळेत निर्णया घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
भ्रष्टाचार सिद्ध करा, राजकारण सोडून देईन
स्वतःच्या घरावर आणि संपत्तीवरून होणाऱ्या टीकेलाही काब्राल यांनी प्रत्युत्तर दिले. मी स्वकष्टातून घर उभारले. माझ्या आई-वडिलांचे घर माझ्या घरापेक्षाही मोठे आहे. माझे वडील वकील होते, आमचा क्रशर व्यवसाय होता आणि आम्ही पूर्वीपासूनच श्रीमंत आहोत. मी राजकारणातून पैसा कमावलेला नाही. माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध करून दाखवावा; मी त्याच क्षणी राजकारण सोडून देईन. माझ्या घरावरून राजकारण करणारे कुडचडेचे नव्हे, तर बाहेरचे राजकारणी आहेत, असा घणाघात त्यांनी केला.