पणजी : गोव्यातील ताळगाव मतदारसंघाच्या भाजप आमदार तथा माजी महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे रविवारी (दि. १९ ) कर्करोगाने निधन झाले. गेले काही महिन्यांपासून त्यांच्यावर गोव्यातील खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. त्या ५६ वर्षांच्या होत्या. एक सक्रिय आणि प्रभावी महिला आमदार म्हणून त्यांचा लौकिक होता.
जेनिफर मोन्सेरात यांनी आपली राजकीय कारकीर्द ताळगाव पंचायत सरपंच व त्यानंतर जिल्हा पंचायत सदस्यापासून केली. त्या २०१२ पासून २०१७ व २०२२ अशा सलग तीन वेळा ताळगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या महसूल मंत्री तथा पणजीचे आमदार अतानासिओ (बाबूश) मोन्सेरात यांच्या पत्नी, तर पणजी महानगरपालिकेचे (सीसीपी) महापौर रोहित मोन्सेरात यांच्या त्या मातोश्री होत.
२४ मार्च १९७० रोजी जन्मलेल्या जेनिफर मोन्सेरात यांनी २००५ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला. जुलै २०१९ मध्ये काँग्रेसच्या दहा आमदारांसह त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २००८ मध्ये पोलिस स्थानक दगडफेक प्रकरणी अनेकांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. त्यामध्ये त्यांचाही समावेश होता व सध्या हा खटला न्यायालयात सुरू आहे.
भाजपमध्ये प्रवेशानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांच्याकडे महसूल, माहिती-तंत्रज्ञान, कामगार व रोजगार ही महत्त्वाची खाती सोपविण्यात आली होती. त्या काळातील सावंत मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री होत्या. तसेच ताळगाव मतदारसंघातून निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या. २०१२ पासून गोवा विधानसभेत एकाच वेळी सदस्य म्हणून कार्य करणारे पहिले पती-पत्नी दाम्पत्य म्हणून जेनिफर आणि बाबूश मोन्सेरात यांची नोंद झाली होती.
गेल्या दशकभरात त्यांनी ताळगाव मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले. त्यांच्या निधनामुळे गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.