Goa Drug Trafficking 
गोवा

Goa Drug Trafficking : गोवा बनतेय ड्रग्ज तस्करीचे केंद्र

हैदराबाद, तेलंगणासह मुंबईत हजारो ग्राहक असल्याचा तपासात संशय

पुढारी वृत्तसेवा

विलास महाडिक

पणजी : गोव्यात पर्यटकांची मोठी वर्दळ असल्याने मुंबई आणि हैदराबाद येथील ड्रग्ज माफिया गोव्याचा विक्री केंद्र म्हणून वापर करत असल्याचे समोर आले आहे. नुकताच तेलंगणातील ईगल फोर्सने गोवा-हैदराबाद ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश केला. हजारो ग्राहकांच्या संपर्कात असल्याचे समोर आलेल्या प्रीतेश, बशारथ आणि तरुण या त्रिकुटाला गोव्यात अटक केली.

गोव्याचे पर्यटन क्षेत्र आणि किनारी भाग ड्रग्ज तस्करीचे अड्डे बनत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गोवा पोलिस आणि तेलंगणा ईगल फोर्स यांच्या संयुक्त कारवाईला महत्त्व प्राप्त झाले असून, या रॅकेटमधील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. हे त्रिकूट मूळचे हैदराबादचे असून, गोव्यात ड्रग्जला मागणी असल्याने त्यांनी येथे ठाण मांडले होते. आंध्र प्रदेशातील एक हजारांहून अधिक ग्राहकांशी, तर तेलंगणातील सुमारे ८०० ग्राहकांशी त्यांचा संपर्क असल्याचे जप्त केलेल्या मोबाईल फोनच्या तपासातून समोर आले आहे. गोवा, हैदराबाद आणि मुंबई पोलिस या रॅकेटचा समन्वयाने तपास करत आहेत.

प्रीतेश हा ग्राहक आणि छोट्या स्तरावरील ड्रग्ज विक्रेत्यांच्या माध्यमातून ड्रग्जचा कथित पुरवठा करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. या माफियांचे मुंबईतील कॉन्टॅक्ट समोर आले असून, त्याची पडताळणी सुरू आहे. तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या पंजागुट्टा पोलिसांनी आर. केशव राज सिंह याला ड्रग्ज विक्री करताना रंगेहात पकडले होते. त्याच्या चौकशीत या रॅकेटचे धागेदोरे गोव्यापर्यंत पोहोचल्याचे उघड झाले. त्यानंतर या नेटवर्कच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी गोवा पोलिसांच्या मदतीने संबंधित ड्रग्ज विक्रेत्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

आर्थिक पुरावेही हाती...

हैदराबाद पोलिसांच्या तपासात महत्त्वाचे आर्थिक पुरावेही हाती लागले आहेत. संबंधित बँक खात्यांची छाननी करताना सुमारे ४८ लाख ४० हजार रुपयांचे ड्रग्जशी संबंधित संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळले आहेत. गोव्यातून हैदराबादला जाऊन ग्राहकांना ड्रग्ज पुरवले जात असल्याचा संशय आहे. त्यानंतर मिळालेली रोख रक्कम संबंधित बँक खात्यांत जमा केली जात असल्याचे तपासातून समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT