Goa Beach Shack  
गोवा

Goa Beach Shack | परदेशी पर्यटकांच्या आगमनाने गोव्यात उत्साह! यंदाचा पर्यटन हंगाम गाजणार; शॅक मालक आशावादी

Goa Beach Shack | समुद्रकिनाऱ्यांवर उत्तम पायाभूत सुविधांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सासष्टी : पुढारी वृत्तसेवा

चार्टर विमानांच्या आगमनाने गोव्यातील पर्यटन हंगामाची उत्साहवर्धक सुरुवात झाली असून, यंदाचा हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा शॅक मालकांनी व्यक्त केली आहे. मात्र, शॅक सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या औपचारिक प्रक्रिया पूर्ण होण्याची ते प्रतीक्षा करत आहेत. 'शॅक ओनर्स वेल्फेअर सोसायटी'चे अध्यक्ष क्रूझ कार्डोझो यांनी चार्टर विमानांच्या आगमनाचे स्वागत केले आहे. पर्यटन क्षेत्रातील हा सकारात्मक कल संपूर्ण हंगामात कायम राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

पर्यटकांचे सातत्याने होणारे आगमन गोव्यातील पर्यटन हंगाम यशस्वी करण्यास तसेच पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना लाभ मिळवून देण्यास मदत करेल, असे कार्डोझो यांनी सांगितले. शॅक सुरू करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होऊन शॅक चालकांना लवकरच व्यवसाय सुरू करता येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पायाभूत सुविधांबाबत बोलताना कार्डोझो यांनी सांगितले की, पर्यटन विभाग आणि शॅक मालकांच्या सोसायटीसोबत झालेल्या बैठकीत पर्यटकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर यापूर्वीच चर्चा करण्यात आली आहे. मात्र, गोव्याला केवळ मूलभूत सुविधांपुरते मर्यादित न राहता समुद्रकिनाऱ्यांवर जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

समुद्रकिनाऱ्यांवर योग्य प्रकारच्या कपडे बदलण्याच्या खोल्या आणि शौचालयांची सुविधा असणे आवश्यक आहे. पर्यटकांना गोव्यात सुखद आणि चांगला अनुभव मिळवून देण्यासाठी या सुविधा महत्त्वाच्या आहेत, असे कार्डोझो यांनी नमूद केले. समुद्रकिनाऱ्यांवरील पार्किंगची समस्याही तातडीने सोडविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांपर्यंत सहज पोहोचता यावे आणि त्यांचा एकूण अनुभव चांगला राहावा, यासाठी पार्किंग व्यवस्था आवश्यक आहे. समुद्रकिनाऱ्यावरील व्यवसायाशी संबंधित विविध प्रश्न यापूर्वीही उपस्थित करून त्याकडे लक्ष देण्याची मागणी झाली होती.

सरकार पायाभूत सुविधांशी संबंधित सर्व समस्यांकडे लक्ष देईल आणि प्रलंबित औपचारिक प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतील, अशी आशा कार्डोझो यांनी व्यक्त केली. त्यामुळे शॅक चालकांना यंदाच्या पर्यटन हंगामात लवकरच व्यवसाय सुरू करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT