पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या हवाई कनेक्टिव्हिटीला एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या नव्या नेटवर्क पुनर्रचनेमुळे मोठा धक्का बसला आहे. या विमान कंपन्यांनी आपल्या जूनच्या वेळापत्रकात बदल करत गोव्यातील दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील सेवा लक्षणीयरीत्या कमी केल्या आहेत.
विशेषतः अत्यंत व्यस्त असलेल्या मुंबई-गोवा दाबोली मार्गावरील १३ साप्ताहिक फेऱ्या एअर इंडियाने रद्द केल्या आहेत, तर दिल्ली-मोप मार्गावरील एका सेवेला पूर्णपणे कात्री लावली आहे. याशिवाय, एअर इंडिया एक्सप्रेसने दिल्ली-मोप दरम्यानच्या साप्ताहिक फेऱ्या २१ वरून १४ वर आणल्या आहेत, तसेच हैदराबाद-गोवा दरम्यानच्या फेऱ्या वाढवण्याचा आधीचा बेत रद्द केला आहे.
विमान कंपन्यांनी या कपातीसाठी हवाई इंधनाच्या वाढत्या किमती, पश्चिम आशियातील संकटामुळे लांबलेले हवाई मार्ग आणि अंतर्गत पुनर्रचना या गोष्टी कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इंडिगोनेही सुरत, बडोदा, राजकोट, भुवनेश्वर आणि चंदीगड या शहरांमधून गोव्यासाठी चालणाऱ्या ३२ साप्ताहिक फेऱ्या बंद केल्या होत्या.