goa assembly winter session  Pudhari
गोवा

Goa Winter Session 2026 | गोवा विधानसभेचे 16 डिसेंबरला एकदिवसीय हिवाळी अधिवेशन

Goa Winter Session 2026 | राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोवा विधानसभेचे एकदिवसीय हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबर २०२६ रोजी बोलावले आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोवा विधानसभेचे एकदिवसीय हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबर २०२६ रोजी बोलावले आहे. आठव्या गोवा विधानसभेच्या १५ व्या अधिवेशनाचे कामकाज या दिवशी होणार असून, आगामी २०२७ विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे.

राज्यपालांनी अधिवेशनासाठी काढलेल्या अधिसूचनेनुसार, १६ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता पर्वरी येथील विधानसभा सभागृहात अधिवेशनाला सुरुवात होईल. या एकदिवसीय अधिवेशनात सरकारकडून विविध प्रशासकीय आणि सार्वजनिक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच आमदारांकडून मतदारसंघांशी संबंधित प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.

डिसेंबरच्या या अधिवेशनाला विशेष महत्त्व असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारच्या कामकाजावर आणि विविध प्रश्नांवर विरोधकांकडून सरकारला घेरण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२७ मध्ये कोणत्याही क्षणी इतर राज्यांबरोबर गोव्यातील निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता आहे.

हा लोकशाहीचा अवमान : युरी आलेमाव

गोवा विधानसभेचे १६ डिसेंबर रोजी बोलवण्यात आलेले एकदिवसीय अधिवेशन म्हणजे लोकशाहीचा अवमान असल्याची तीव्र टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. सरकार जनतेच्या प्रश्नांना सामोरे जाण्याऐवजी त्यापासून पळ काढत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात अनेक महत्त्वाचे आणि जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न प्रलंबित असताना विधानसभेचे कामकाज केवळ एका दिवसापुरते मर्यादित ठेवण्यात आल्याने सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे.

बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था, म्हादई नदीचा प्रश्न आणि वाढती पर्यावरणीय हानी यांसारखे गंभीर विषय गोव्यासमोर आहेत. या प्रश्नांवर सरकारला विधानसभेत जाब विचारण्याची आणि त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची गरज असताना, एकदिवसीय अधिवेशनामुळे सविस्तर चर्चा होण्यास पुरेसा वेळ मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT