गोवा

Goa Assembly Protest 2026 | गोवा विधानसभा हादरली! भूसंरक्षण विधेयकावरून विरोधकांचा 'काळा' निषेध; कामकाज दोनदा तहकूब

Goa Assembly Protest 2026 | गोवा विधानसभेत शुक्रवारी विरोधी पक्षाच्या आमदारांनी काळे कपडे परिधान करून जोरदार गदारोळ केला.

पुढारी वृत्तसेवा

  1. 39(ए) भूसंरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ

  2. काळे कपडे घालून विरोधी आमदारांचा निषेध

  3. सभापतींच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी

  4. मार्शलना आदेश देऊनही विरोधक हटले नाहीत

  5. विधानसभा कामकाज प्रथम 10 मिनिटे आणि नंतर 30 मिनिटांसाठी तहकूब

पणजी : गोवा विधानसभेत शुक्रवारी विरोधी पक्षाच्या आमदारांनी काळे कपडे परिधान करून जोरदार गदारोळ केला. 39(ए) भूसंरक्षण विधेयकाचा कामकाजात समावेश न केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी करत सभापतींच्या आसनासमोर जाऊन आंदोलन केले. या गदारोळामुळे अखेर विधानसभा कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.

शुक्रवार हा परंपरेनुसार खाजगी विधेयकांचा दिवस मानला जातो. मात्र निवृत्त न्यायमूर्ती फेर्दीन रिबेलो यांनी तयार केलेल्या राज्यातील जमीन संरक्षणाशी संबंधित आणि 39(ए) कलम रद्द करण्याच्या प्रस्तावित विधेयकाचा त्या दिवशीच्या कामकाजात समावेश करण्यात आला नव्हता. यावरून विरोधी पक्षाच्या आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

विरोधी आमदारांनी काळे कपडे घालून सभागृहात प्रवेश केला आणि निषेध नोंदवत फलक हातात घेऊन घोषणाबाजी सुरू केली. “बंद करा, बंद करा, हुकूमशाही बंद करा” अशा घोषणा देत त्यांनी सभापतींच्या आसनासमोर जाऊन ठिय्या दिला. काही आमदार सुरुवातीला नेहमीच्या पोशाखात सभागृहात आले होते; मात्र नंतर त्यांनी काळे शर्ट परिधान करून आंदोलनात सहभाग घेतला.

सभागृहातील गोंधळ वाढू लागल्याने सभापती डॉ. गणेश गावकर यांनी विरोधी आमदारांना वारंवार आपल्या जागेवर बसण्याचे आवाहन केले. तरीही विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सभापतींनी मार्शलना विरोधी आमदारांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले.

मात्र विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहातच बैठक मारल्यामुळे मार्शलना त्यांना बाहेर काढणे कठीण झाले. त्यामुळे अखेर सभापतींनी विधानसभा कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्याची घोषणा केली.

यानंतर कामकाज पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र विरोधक पुन्हा एकदा सभापतींच्या आसनासमोर पोहोचले आणि घोषणाबाजी सुरूच ठेवली. परिणामी परिस्थिती पाहता सभापतींना पुन्हा एकदा कामकाज ३० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

या प्रकारामुळे विधानसभा सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विरोधकांनी 39(ए) भूसंरक्षण विधेयकाचा कामकाजात समावेश करण्याची मागणी कायम ठेवत आंदोलन सुरूच ठेवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT