पणजी : राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. सरकारने या अधिवेशनात 16 नवी विधेयके मांडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आमदारांकडून 15 खासगी सदस्य प्रस्ताव सादर होणार आहेत. ही विधेयके आणि प्रस्तावच सरकारची दमछाक करण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रश्नोत्तर तासांमध्येही सरकारची कसोटी लागेल, कारण सत्ताधार्यांबरोबर विरोधकांनीही अधिवेशनासाठी विशेष तयारी केली आहे.
या अधिवेशनात सरकारकडून जी विधेयके सादर होणार आहेत, त्यात बेकायदा बांधकामांना कायदेशीर दर्जा देण्याबाबतचे विधेयक सर्वाधिक चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. अशी तीन विधेयके आहेत. राज्यात विविध ठिकाणी उभ्या असलेल्या अनधिकृत वसाहती, घरे यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी योजनेचा भाग म्हणून हे विधेयक मांडले जाईल. अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांशी संबंधित सुधारणा विधेयक, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील धोरणात्मक बदल करणारी विधेयके, शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी विधेयके मांडली जातील.
या अधिवेशनात सादर होणार्या विधेयकांद्वारे राज्यातील काही जुन्या कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा, तसेच नवीन व्यवस्थापन प्रणाली लागू करण्याचा सरकारचा मानस आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, भू-विकास, सांडपाणी व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटायझेशन यासारख्या क्षेत्रांवर भर देण्यात येईल.
अधिवेशनात आमदारांकडून 15 खासगी सदस्य प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. हे प्रस्ताव प्रामुख्याने स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, युवक विकास, क्रीडा, पर्यटन, तसेच पर्यावरण संरक्षण या मुद्यांशी संबंधित असतील. काही प्रस्ताव हे विशेषतः प्रादेशिक असंतुलन, पायाभूत सेवा, आणि जिल्हास्तरावरील प्रशासकीय अपयश यावर प्रकाश टाकणारे असतील.
या अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून अधिवेशनात लोकहिताच्या योजना आणि कायदे केले जाणार असले, तरी विरोधकांकडून सरकारला खडे बोल सुनावले जाण्याची शक्यता आहे. गुन्हेगारी घटनांमध्ये झालेली वाढ, आरोग्य व्यवस्थेतील कमतरता, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्न या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील.
राज्य सरकारने राज्यातील लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निर्णय घेत रॉटविलर आणि पिटबुल यासारख्या आक्रमक जातींच्या कुत्र्यांवर बंदी घालणार्या विधेयकाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे.