पणजी : राज्यातील महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २२ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अधिवेशन किती दिवस चालेल, याचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध धोरणे, विकासकामे आणि महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, गोव्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी ‘गोवा राज्य हेरिटेज पॉलिसी’ला मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. या धोरणामुळे ऐतिहासिक इमारती, मंदिरे, चर्चेस आणि पारंपरिक वास्तूंचे संरक्षण व संवर्धन अधिक प्रभावीपणे होणार आहे.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी युनिटी मॉल प्रकल्पासाठी चिंबल येथे वर्क ऑर्डर जारी करण्यात आली आहे. या मॉलमध्ये गोव्याच्या स्थानिक उत्पादने, हस्तकला वस्तू आणि पर्यटन माहितीला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे स्थानिक उद्योजकांना नवसंजीवनी मिळणार असून, पर्यटकांसाठीही हे आकर्षण ठरणार आहे.
राज्यातील दुर्गम भागातील डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वाघेरी (सत्तरी) येथे २०० चौ. मीटर सरकारी जमिनीवर मोबाईल टॉवर उभारणीस मंजुरी देण्यात आली आहे. तसेच सांगे तालुक्यातही मोबाईल टॉवरसाठी सरकारी जमीन वापरण्यास मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य व इतर सेवा अधिक सुलभ होणार आहेत.
या निर्णयांमुळे गोव्यातील वारसा जपला जाणार असून, स्थानिक उद्योगांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना थेट फायदा होणार आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे.