पणजी : पुढारी वृत्तसेवा
राजकारणाचे आकर्षण भल्याभल्यांना स्वस्थ बसू देत नाही. कशीबशी पंच म्हणून निवडून आलेली व्यक्ती सरपंच होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगते. सरपंच झाल्यानंतर जिल्हा पंचायत सदस्य आणि आमदार होण्याची स्वप्ने पाहिली जातात, तर आमदार झालेली व्यक्ती मंत्री आणि मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगते.
एकदा राजकारणाची गोडी लागली की ती सहसा सुटत नाही. याच राजकीय आकर्षणामुळे आता अनेक माजी नोकरशहा, वरिष्ठ अधिकारी, निवृत्त सरकारी कर्मचारी आणि माजी पोलिस अधिकारीही आमदारकीच्या निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत लागले आहेत. काहींनी तर आपापले मतदारसंघ निश्चित करून प्रचारालाही सुरुवात केली आहे.
फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक माजी नोकरशहा, सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी, माजी पोलिस अधिकारी आणि राजकीय नियुक्त्यांवर काम केलेले अधिकारी राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. आपल्या प्रशासकीय अनुभवाचा, व्यावसायिक पार्श्वभूमीचा आणि स्थानिक प्रश्नांची जाण याचा उपयोग करून जनतेची सेवा करण्याचा त्यांचा दावा आहे.
संभाव्य उमेदवार म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी अनेकांनी मतदारसंघात विविध उपक्रम सुरू केले असून, जनसंपर्क आणि सामाजिक कार्यकार्यावरही भर दिला आहे. राजकारणात प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे (पीडब्ल्यूडी) माजी प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांचा समावेश आहे.
चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी सहायक अभियंता म्हणून १० जुलै १९८६ रोजी सेवेला सुरुवात केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता आणि अखेरीस प्रधान मुख्य अभियंता या पदांपर्यंत मजल मारली. ३१ जानेवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्यांना मंत्रिमंडळाच्या मंजुरीने सलग तीन वेळा सेवा मुदतवाढ देण्यात आली होती. पेडणेच्या जनतेची सेवा करण्याच्या तीव्र इच्छेने आपण राजकारणात प्रवेश करीत असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.
पेडणे मतदारसंघातून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे (गोमेकॉ) माजी डॉ. संजय कोरगावकर हेही निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात प्रचार आणि जनसंपर्क सुरू केला आहे. जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने आपण राजकारणात येत असल्याचे डॉ. कोरगावकर सांगतात. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर करीत आहेत.
भाजपचे युवा नेते संकेत आर्सेकर यांनी ऑगस्ट २०२६ मध्ये मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी सावर्डे विधानसभा मतदारसंघात पूर्णवेळ राजकीय कामकाजावर लक्ष केंद्रित केले आहे. विविध उपक्रम आणि स्थानिक रहिवाशांशी नियमित संवाद साधून त्यांनी मतदारसंघातील जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. निवडणूक लढविण्याची आपली महत्त्वाकांक्षा त्यांनी स्पष्ट केली आहे. सध्या सावर्डे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे सभापती डॉ. गणेश गावकर करीत आहेत.
सासष्टी हा पारंपरिकरीत्या विरोधी पक्षांचा प्रभाव असलेला भाग मानला जातो. या भागातही माजी नोकरशहा आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती संभाव्य राजकीय पर्याय म्हणून पुढे येत आहेत. मात्र, त्यांना राजकीय पक्षांनी उमेदवारी दिल्यास विद्यमान इच्छुकांमध्ये तिकीटवाटपावरून अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
कुंकळ्ळी मतदारसंघात विरोधी पक्षानेते युरी आलेमाव यांचे प्रतिनिधित्व असताना माजी सनदी अधिकारी एल्विस गोम्स अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. नुवे मतदारसंघात मंत्री असताना विशेष कार्याधिकारी म्हणून काम केलेले आणि मांस प्रकल्पाचे संचालक राहिलेले लिंडन मोंतेरो निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. सध्या नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा भाजपमध्ये आहेत.
कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे निवृत्त संचालक आलेक्सो डिकॉस्टा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. २०२७ च्या निवडणुकीत उमेदवारी मिळविण्याच्या दृष्टीने त्यांनी स्थानिक नागरी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. नुवे मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास ते इच्छुक आहेत.
निवृत्त पोलिस अधीक्षक टोनी फर्नाडिस यांनीही कुंकळ्ळी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत त्यांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. याशिवाय सांगे मतदारसंघातून माजी लेखा संचालक सत्यवान तवडकर, म्हापसा मतदारसंघातून दिव्यांग आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद पावस्कर आणि प्रियोळ मतदारसंघातून समाजकल्याण खात्याचे माजी अधिकारी मच्छींद्र शिरोडकर हेही निवडणुकीच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पेडणेमधून कला व संस्कृती खात्याचे माजी उपसंचालक मिलिंद माटे हेही इच्छुक आहेत.
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या या संभाव्य उमेदवारांमध्ये पेडणे मतदारसंघातून उत्तम पार्सेकर आणि डॉ. संजय कोरगावकर, म्हापसा मतदारसंघातून मयूर सावकार आणि गुरुप्रसाद पावस्कर, प्रियोळमधून मच्छींद्र शिरोडकर, नुवेमधून लिंडन मोंतेरो आणि आलेक्सो डी कोस्टा,
कुंकळ्ळीमधून एल्विस गोम्स आणि टोनी फर्नाडिस, सावर्डेमधून संकेत आर्सेकर, तर सांगेमधून सत्यवान तवडकर यांचा समावेश आहे. प्रशासकीय सेवेत दीर्घ अनुभव घेतल्यानंतर आता राजकीय क्षेत्रात नशीब आजमावण्यास इच्छुक असलेल्या या व्यक्तींमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विविध मतदारसंघांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.