पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर
विधानसभा निवडणूक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारीत आचारसंहिता लागेल. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास अवघे दोन ते पावणे दोन महिने बाकी राहिलेले आहेत.
मात्र, युती किंवा उमेदवार निश्चितीबाबत सर्वच राजकीय पक्ष दोलायमान स्थितीत दिसत असून, काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण तयार झालेले आहे. रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाच्या दोन गटांच्या नेत्यांनी एकमेकांना संपवण्याची भाषा सुरू केल्यामुळे त्या पक्षात एकप्रकारचे धुमशानच सुरू आहे.
दुसरीकडे, मगों पक्षाने सहा जागा लढवण्याची तयारी सुरू केल्याने व त्यात भाजपचे आमदार असलेल्या पेडणे, शिरोडा आणि प्रियोळ या जागांचा समावेश असल्याने भाजप-मगो युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपने आपल्या नव्या मुख्यालयात दररोज कार्यकर्ते व नेत्यांचा बैठकांचे सत्र सुरू केले आहे. पणजीत भाजपचे मुख्यालय असताना माध्यमांद्वारे त्यांची दखल घेतली जात होती. मात्र, आता गुपचूप अनेक बैठका होत असून माध्यमांना त्यांची माहिती मिळत नाही.
काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षातील युतीची बोलणी पुढे सरकत नाहीत. दोन ते तीनवेळा दहा ते पंधरा मिनिटे झालेली बोलणी अद्याप जागा वाटपापर्यंत पोहचलेली नाही. या बैठकांमध्ये पक्षाचे नेते एकत्र बसतात. चाय पिया समोसा खाया होते; प्रत्यक्षात ठोस काहीच निर्णय होत नाहीत. त्यामुळे गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेतेही नाराज झाले आहेत.
काँग्रेसने लवकरात लवकर युती करून जागावाटप करावे, जेणेकरून उमेदवाराला प्रचार करण्याची संधी मिळेल, असे आमदार विजय सरदेसाई यांना वाटते. मात्र, काँग्रेस त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद देत नसल्याने या दोन पक्षांतील युतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेसने आरजी पक्षासोबत युती करण्याचे ठरवले होते. मात्र, आता आरजी पक्षातच दोन गट झाल्याने त्यांच्या युतीवरही संशयाचे ढग निर्माण झाले आहेत.
काँग्रेस आपण किमान ३० जागा लढवणार म्हणत असली तरी या पक्षाकडे निवडून येऊ शकतील अशा बलवान उमेदवारांची कमतरता आहे. काँग्रेसने आता उमेदवारी अर्ज मागवले आहेत. यापूर्वीसुद्धा काँग्रेसने अनेकवेळा उमेदवारी अर्ज मागवले होते. त्याला कितपत प्रतिसाद मिळाला हे गुलदस्त्यात आहे.