goa assembly winter session  Pudhari
गोवा

Goa Assembly Election | तृणमूल, राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष सक्रिय कधी होणार?

Goa Assembly Election | विधानसभा निवडणुकीला अवघे पाच महिने असतानाही पक्षांमध्ये शांतता : भाजप, काँग्रेस सक्रिय

पुढारी वृत्तसेवा

पणजी : विठ्ठल गावडे - पारवाडकर

विधानसभा निवडणुकीला अवघे पाच महिने शिल्लक आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या काँग्रेस 'गोवा राखा' यात्रेच्या निमित्ताने गावा-गावातील मतदारांपर्यंत पोहोचत आहे. भाजपही 'सेवा सद्भावना' कार्यक्रमाच्या माध्यमातून सक्रियपणे काम करत आहे. लोकांशी संपर्क वाढवत आहे. काँग्रेस व आरजी पक्षाची युतीची बोलणी सुरू झाली आहे.

तसेच भाजप व मगोची युती निवडणुकीत राहणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी जाहीर केले आहे. गोवा फॉरवर्ड आणि आप यांनीही 'गोवा फर्स्ट' नावाने आघाडी स्थापन करून कामाला सुरुवातही केली आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांमध्ये अद्यापही शांतता दिसून येते. हे पक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मगोसोबत युती करून तब्बल २४ जागा लढवलेला तृणमूल काँग्रेस पक्ष सध्या कुठेच दिसत नाही. या पक्षाच्या नेत्यांच्या कोणत्याही राजकीय हालचाली नाहीत. त्यासोबतच यापूर्वी राज्यात मंत्रिपदे भूषविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि अनेक वर्षांपासून राज्यात कार्यरत असलेल्या व २१ जागा लढवण्याची घोषणा केलेल्या शिवसेना पक्षानेही अद्याप काम सुरू केलेले नाही.

निवडणुकीला अवघे पाच महिने शिल्लक असताना या पक्षांतील ही सुस्ती पक्षांच्या विस्ताराला बाधक ठरू शकते. ऐन निवडणुकीत प्रचार सुरू करून हालचाली गतिमान करून या पक्षांनी उमेदवार उभे केले, तरी मतदार त्यांना सहकार्य करतील की नाही याची शक्यता नाही.
२०२२ च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २४ जागा लढवून ४७,३९९ मते घेतली होती.

माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव व माजी आमदार किरण कांदोळकर आणि बेंजामिन सिल्वा यांना उमेदवारी दिली होती. चर्चिल आलेमाव (बाणावली ५,१४०), वालंका आलेमाव (नावेली ४,७३८), कविता कांदोळकर (थिवी ७,३६३) यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते, तर माजी आमदार किरण कांदोळकर (हळदोणा ३,७४७) यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. ट्रोजन डिमेलो हे तृणमूलचे अस्तित्व दाखवण्यासाठी कधीतरी पत्रकार परिषदा घेतात. तेवढीच काय ती सक्रियता दिसून येते.

दुसरीकडे ९ जागा लढवून ७,०९६ मते घेतलेली राष्ट्रवादी, व ५ मतदारसंघांत लढवून ५६० मते घेतलेली शिवसेना हे पक्षही राज्यांत धडपड चालू आहे. यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) ३ आमदार निवडून आले. त्यातील दोन मंत्रीही होते.

मात्र, सध्या हा पक्ष अस्तित्वहीन झालेला आहे. माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. २०२२ च्या निवडणुकीत या पक्षाने ९ जागा लढवल्या. डिसोझा यांना दाबोळीत १,०३७ मते मिळाली व ते पाचव्या क्रमांकावर पोहोचले. या पक्षाचे नुवेचे उमेदवार मिकी पाशेको (१,३०५) व वेळ्ळीचे उमेदवार फिलिप नेरी रॉड्रिग्ज (३,४२०) या माजी मंत्र्यांनी चांगली मते घेतली होती. मात्र ते आता या पक्षासोबत नाहीत.

उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गोव्यात काम सुरू केले आहे. २०२२ च्या निवडणुकीचा विचार करता शिवसेनेने ५ जागा लढवल्या. मात्र, त्यांच्या उमेदवारांना एकूण ५६० मते मिळाली. यावेळी २१ जागा लढवण्याची घोषणा शिवसेनेने केली असली तरी प्रत्यक्ष काम मात्र दिसत नाही.

तृणमूल उमेदवारांची मते:

  • चर्चिल आलेमाव (बाणावली ५,१४०)

  • वालंका आलेमाव (नावेली ४,७३८)

  • कविता कांदोळकर (थिवी ७,३६३)

  • किरण कांदोळकर (हळदोणा ३,७४७)

  • संदीप वाझरकर (परवरी ३,७६७)

  • समीर वळवईकर (कुंभारजुवे ३,०७२)

  • गिलबर्ट डिसोझा (कुडचडे ३,२४६)

  • बेंजामिन सिल्वा (वेळ्ळी ४,१३४)

राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांची मते:

  • जुझे फिलिप डिसोझा (दाबोळी १,०३७)

  • मिकी पाशेको (नुवे १,३०५)

  • फिलिप नेरी रॉड्रिग्ज (वेळ्ळी ३,४२०)

शिवसेना उमेदवारांची मते:

  • सुभाष केरकर (पेडणे २२३)

  • बाबली नाईक (मांद्रे ११६)

  • व अन्य तीन उमेदवारांना १०० पेक्षा कमी मते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT