पणजी : पुढारी वृत्तसेवा
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोवा विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान मोठा गोंधळ उडाला. विरोधी पक्षातील आमदारांनी सभागृहात हातात फलक उंचावत घोषणाबाजी करत आंदोलन केले. अग्निकांडातील पीडितांना तातडीने न्याय देण्याची मागणी करत विरोधी आमदार सभापतींच्या आसनाकडे धाव घेतल्याने सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले.
विरोधकांच्या आक्रमक आंदोलनामुळे विधानसभेत काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सभापतींच्या सूचनेनुसार विधानसभेच्या मार्शल्सनी हस्तक्षेप करत विरोधी पक्षातील आमदारांना सभागृहाबाहेर काढले. या घटनेमुळे विधानसभेचे कामकाज काही काळासाठी ठप्प झाले.
यानंतर सभापतींनी सभागृहात शांतता प्रस्थापित झाल्यानंतर कामकाज पुन्हा सुरू केले. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरुवात करण्यात आली. या गोंधळामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी व विरोधकांमधील तणाव स्पष्टपणे दिसून आला.