Goa nightclub fire Video
पणजी : गोव्यातील अरपोरा परिसरातील नाईट क्लबमधील भीषण आग लागण्यापूर्वीचा व्हिडिओ समोर आला आहे. शनिवारी रात्री १२ च्या दरम्यान या नाईट क्लबमध्ये आग लागली. पार्टी सुरू असताना वापरलेल्या फायर गनमुळे ज्वलनशील पदार्थ पेटल्याने हा भडका उडाला, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
हडफडे येथील या नाईट क्लबमध्ये आग लागून झालेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये तीन महिलांसह ४ पर्यटक, १४ क्लबचे कामगार व इतर ७ जणांचा समावेश आहे. तिघांचा जळून मृत्यू झाला तर इतरांचा गुदमरून मृत्यू झाला. गोव्यातील आगीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना असून या नाईट क्लबमध्ये आग लागण्यापुर्वीचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
आग लागण्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये नाईट क्लबमध्ये गाणे आणि डान्स सुरू होता आणि सर्वजण आनंदात होते. मात्र, अचानक भडका उडाल्यानंतर आणि आग व धूर यायला सुरुवात झाल्यानंतर क्लबमधील पर्यटक आणि कर्मचारी घाबरले. हा नाईट क्लब Calangute Beach ते Baga Beach दरम्यानच्या परिसरात आहे, जिथे मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित असतात.