IFFI 2026 Girish Kasaravalli  
गोवा

IFFI 2026 Girish Kasaravalli | चित्रपट कधीच अराजकीय नसतो! इफ्फीमध्ये गिरीश कासारवल्ली यांनी मांडली महत्त्वाची भूमिका

IFFI 2026 Girish Kasaravalli | ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली : इफ्फीतील संवाद सत्रात मांडले विचार

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सामाजिकदृष्ट्या सजग चित्रपट राजकीयदृष्ट्याही भक्कम असायला हवेत. कोणताही चित्रपट अ-राजकीय किंवा केवळ मनोरंजनात्मक असू शकत नाही. एखाद्या व्यवस्थेची रचना बदलण्याचा प्रयत्न हीच राजकीय कृती असते. ती व्यवस्था टिकवण्याच्या बाजूने आहे की बदलाच्या बाजूने, हे महत्त्वाचे ठरते.

चित्रपटातील पात्रे विशिष्ट विचारसरणीचा प्रचार करणारी न ठरता मानवी गुंतागुंतीसह समोर यावीत, यासाठी त्यांना आतून आणि बाहेरून समजून घेणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी शनिवारी व्यक्त केले.

इफ्फीअंतर्गत कला अकादमीत आयोजित संवादसत्रात नमन रामचंद्रन यांनी कासारवल्ली यांची मुलाखत घेतली. यावेळी चित्रपट, राजकारण, समाज, पात्रनिर्मिती आणि चित्रपट निर्मितीतील बदल अशा विविध विषयांवर कासारवल्ली यांनी विचार मांडले.

समाजाची किंवा एखाद्या व्यवस्थेची रचना बदलण्याची इच्छा व्यक्त केली जाते, तेव्हाच राजकीय सजगता दिसून येते. मुख्य प्रवाहातील असो किंवा कलात्मक, प्रत्येक चित्रपटातून दिग्दर्शक राजकीय विधान करत असतो. ते प्रचलित विचारसरणीच्या समर्थनार्थ असते किंवा तिच्या विरोधात. या भूमिकेपासून कोणताही दिग्दर्शक अलिप्त राहू शकत नाही, असे कासारवल्ली यांनी नमूद केले.

... पण' उत्तरापेक्षा अर्थपूर्ण

चित्रपटातून 'हे बरोबर आणि हे चूक' असे थेट सांगणे चुकीचे आहे. कारण समाजातील घडामोडी आणि परिस्थिती काळानुसार बदलत असतात. त्यामुळे एखादी गोष्ट योग्य किंवा अयोग्य ठरवणे म्हणजे संपूर्ण ऐतिहासिक प्रक्रियेकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. कन्नडमधील लेखक डॉ. यू. आर. अनंतमूर्ती नेहमी म्हणायचे की, प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर शेवटी एक 'पण' ठेवून तो प्रश्न तिथेच सोडावा. 'ते चांगले आहे, पण...' या वाक्यातील 'पण'ला उत्तरापेक्षा अधिक अर्थ असतो. कारण त्यामुळे लोकांना विचार करण्यास भाग पाडले जाते. म्हणूनच आपण सोपे निर्णय देत नाही, असे कासारवल्ली यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT