पणजीः बैठकीत मार्गदर्शन करताना गिरीश चोडणकर. सोबत इतर. 
गोवा

Goa|गोव्याला सक्षम पर्याय देणारी काँग्रेस उभारू

गिरीश चोडणकर : कार्याध्यक्ष, जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा

पुढारी वृत्तसेवा

congress to emerge as strong alternative in goa girish chodankar

पणजी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कार्याध्यक्ष एम. के. शेख यांच्यासमवेत पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी आणि २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकांच्या रणनितीवर चर्चा करण्यासाठी रविवारी (दि.३१) विशेष आढावा बैठक घेतली.

या बैठकीत तळागाळात पक्षाची रचना मजबूत करणे, जनजागृती वाढवणे आणि गोव्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक प्रयत्न अधिक तीव्र करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

चोडणकर म्हणाले, गोव्यासाठी एक विश्वासार्ह आणि लोककेंद्रित पर्याय देण्यास सक्षम असलेली अधिक मजबूत काँग्रेस संघटना उभारण्यासाठी एकता, शिस्त आणि तळागाळातील सहभाग महत्वाचा आहे. यावेळी उत्तर गोवा अध्यक्ष शशांक नार्वेकर, दक्षिण गोवा अध्यक्ष असिझ नोरोन्हा, कुशावती जिल्हाध्यक्ष राजेश वेरेणकर, म्हादई जिल्हाध्यक्ष मंगळदास नाईक आदी उपस्थित होते.

काँग्रेस कुटुंब; प्रदेशाध्यक्ष निवड हा कौटुंबिक निर्णय, खासदार विरिएतो फर्नांडिस यांनी मांडली भूमिका

पणजी : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेस हे कुटुंब आहे आणि प्रदेशाध्यक्ष निवडीचा निर्णय हा कौटुंबिक आहे. त्यामुळे मी त्यावर जास्त भाष्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार कॅ. विरिएतो फर्नाडिस यांनी दिली. फर्नाडिस म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीआधी प्रदेशाध्यक्ष का बदलला याबाबत मी बोलू शकत नाही, त्यावर वरिष्ठ बोलतील. आपण त्यांच्याशी बोला.

दक्षिण गोव्यातील कार्यकर्ते फर्नाडिस यांना खासदारकीचा राजीनामा द्यायला सांगत असल्याबद्दल गोव्यातील लोकांचे त्यांना विचारले असता, फर्नांडिस म्हणाले की, दक्षिण आणि माझे खूप जुने ऋणानुबंध आहेत. पर्यावरण चळवळ, निवडणुका या माध्यमातून आम्ही मी खासदार होण्याआधीपासून आम्ही एकत्र काम करीत आहोत. आता निर्माण झालेल्या प्रश्नावर पक्षाचे नेते चर्चा करून निर्णय घेतील कारण तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यावर मी भाष्य करणे संयुक्तिक दिसणार नाही.

आगामी निवडणुकीबद्दल फर्नाडिस म्हणाले की, आम्ही निवडणुकीसाठी केव्हाही तयार आहोत. मात्र, निवडणूक म्हणजे उमेदवार आणला, बसवला असे होत नाही. त्यासाठी ब्लॉक पातळीवर कार्यक्रम ठरवावे लागतात, त्याचे नियोजन करावे लागते. त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही करावी लागते. सध्या थिवी ब्लॉकमध्ये चांगले काम सुरू आहे, असे सांगून निवडणूक जाहीर होईल तेव्हा पाहू. मात्र, आम्ही केव्हाही निवडणुकीला तयार आहोत, असा पुनरुच्चारही फर्नाडिस यांनी केला.

प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय पंचायत निवडणुकीपूर्वीचा

पणजी : डिसेंबर महिन्यात झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीपूर्वीच गोव्याचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय झाला होता. गोव्यातील मुख्य नेत्यांना याची पूर्ण कल्पना होती. बंगळुरू येथे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत याविषयी सविस्तर चर्चाही झाली होती. आता मी स्वतः माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि खासदार विरिएतो फर्नाडिस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. पक्षात जर कोणी नाराज असेल, तर त्यांची नाराजी दूर करण्यात आम्हाला नक्कीच यश येईल, असे काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

अमित पाटकर यांना पदावरून हटवून गिरीश चोडणकर यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर गोव्यातील काँग्रेसमध्ये राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहे. दक्षिण गोव्याचे खासदार विरिएतो फर्नाडिस यांनी आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचे सांगत तीव्र संताप व्यक्त केला होता. याशिवाय प्रदेश सरचिटणीस उसगावकर, रणजितसिंग राणे आणि डिचोली गटाचे अध्यक्ष दत्ताराम शेट्ये यांनीही आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. पक्षात राजीनाम्यांची मालिका सुरूच असताना, पक्षाकडून सर्व नाराज नेत्यांची समजूत काढली जाईल, असे माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा पंचायत निवडणुकीपूर्वी बंगळुरू येथे बऱ्याच नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. त्यावेळी खर्गे यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल, असे स्पष्ट संकेत दिले होते आणि त्याप्रमाणेच आता अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. हा हायकमांडने घेतलेला निर्णय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT