पणजी : पुढारी वृत्तसेवा
आमदार नीलेश काब्राल यांनी भाजपमधील अंतर्गत गटबाजीबाबत व्यक्त केलेली नाराजी, आप आणि गोवा फॉरवर्डमध्ये झालेली 'गोवा फर्स्ट' आघाडी तसेच काँग्रेस आणि आरजीपी यांच्यातील आघाडीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या घडामोडींवर काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी विरोधकांमध्ये फूट पाडण्यासाठी भाजपने १०० कोटींची तरतूद केल्याचा आरोप केला आहे.
विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्यासाठी तसेच नवीन राजकीय पक्ष किंवा आघाडी उभी करण्यासाठी भाजपने १०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचा दावा चोडणकर यांनी केला. निवडणुकीच्या काळात हे बजेट दुप्पट होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. गोव्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि नव्या आघाड्यांच्या निर्मितीमागे भाजपची रणनीती असल्याचा आरोप त्यांनी केला. 'गोवा फर्स्ट'च्या नावाखाली सुरू असलेल्या हालचालीही याच योजनेचा भाग असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधकांचे सरकार स्थापन होणार नाही आणि भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असा दावा केला आहे. या दाव्यामागे भाजपची आर्थिक ताकद असल्याचे चोडणकर यांनी म्हटले. काँग्रेस आणि आरजीपीची आघाडी जवळपास निश्चित झाली असल्याचे सांगत चोडणकर यांनी दोन्ही पक्षांच्या मतदारांबाबतही दावा केला.
काँग्रेसकडे २५ ते ३० टक्के, तर आरजीपीकडे सात ते दहा टक्के मतांचा पाया असल्याचे सांगून ही आघाडी सुमारे ४० टक्के मते मिळवून भाजपला पर्याय ठरू शकते, असे ते म्हणाले. आमदार विजय सरदेसाई यांची ताकद फातोर्डा मतदारसंघापुरती मर्यादित असल्याचा दावा करत आपचा मतटक्का घसरल्याने नव्या आघाडीचा काँग्रेसवर काहीच परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजप आणि आपमध्ये अंतर्गत समझोता झाल्याचा आरोपही चोडणकर यांनी केला. पंजाबमध्ये भाजपला मदत करणे आणि गोव्यात भाजपला मदत करण्यासाठी आपला पक्ष बळकट करणे, असा या समझोत्याचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. तसेच विजय सरदेसाई यांनी २०१७ मध्ये जनादेशाचा अनादर करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती, असा आरोप त्यांनी केला. आपच्या अनेक लोकप्रतिनिधींनी इतर राज्यांत पक्षांतर केल्याचा दाखला देत काँग्रेसवर पक्षांतराचा आरोप करण्याचा या पक्षांना नैतिक अधिकार नसल्याचेही चोडणकर म्हणाले.
काँग्रेस आणि आरजीपीची आघाडी जवळपास निश्चित
नवीन आघाडीचा काँग्रेस-आरजीपीवर परिणाम नाही
गोवा फॉरवर्डने सोशल मीडियाद्वारे चोडणकर यांच्या विधानांवर पलटवार केला. राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि भाजपला थेट आव्हान देण्याऐवजी विरोधी पक्षाच्या आक्रमक आमदाराला लक्ष्य करणे योग्य नसल्याचे सांगत, गोव्यात भाजपसमोर 'गोवा फर्स्ट' हा प्रतिस्पर्धी असल्याचे पक्षाने म्हटले.