पणजी ः गेल्या काही दशकात मुले व युवा वर्गामध्ये पुस्तके वाचनाची आवड कमी झाली आहे. ही आवड पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी गर्ल्स इस्लामिक संघटनेतर्फे (जीआयओ) गोव्यात 7 डिसेंबर ते 27 डिसेंबर या दरम्यान 20 दिवशीय फिरसे किताब मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेवेळी मुलांना व युवा वर्गाला पुस्तके वाचण्यास दिली जाणार आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेला जीआयओच्या प्रदेश अध्यक्ष मदिहा खान, सचिव शर्मिन खान देशमुख, क्षेत्रीय सदस्य ॲड. आफ्रिन खान व शदाब बेपारी उपस्थित होते. या मोहिमेमागील मुख्य उद्देश सांगताना अध्यक्ष महिदा खान म्हणाल्या की, पुस्तक वाचन ही मानवतेच्या सर्वात जुन्या व शक्तिशाली परंपरांपैकी एक आहे. या मोहिमेद्वारे गोव्यातील समुदायांना शिक्षण, संवाद व पुस्तकाबद्दल नवीन वचनबद्धतेद्वारे गुंतवणून ठेवण्याचा या प्रयत्न आहे. गेल्या दोन दशकात वाचनाची आवड खूप कमी झाली आहे. जागतिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, आनंदासाठी वाचन करणाऱ्या लोकांचे प्रमाण सुमारे 40 टक्के कमी झाले आहे. वाचनालयाची सुविधा खालावली आहे. महाराष्ट्रातील सुमारे 34 हजार गावांमध्ये वाचनालयाची सुविधा नाही. येत्या 7 डिसेंबरपासून पणजीतील चर्चस्क्वेअर येथून या फिरसे किताब मोहिमेला सुरुवात होणार आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालये तसेच काही वाचनालयांशी संपर्क साधण्यात आला आहे. सामाजिक शक्ती म्हणून वाचन पुरुज्जीवित करणे हे त्याचे उद्दिष्ट्य आहे. ही वाचन पद्धत राज्याच्या कानाकोपऱ्यात मुलांमध्ये तसेच युवा वर्गामध्ये आवड निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. 20 दिवसांच्या या उपक्रमात संवाद, व्याख्याने याचाही समावेश असेल. विविध भाषेतील व संस्कृतीची पुस्तके वितरित करून त्यात रूची निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती सचिव शर्मिन खान यांनी दिली.