पणजी : धारगळ येथे 1 लाख 89 हजार चौ.मी. जागा गोवा क्रिकेट संघटनेला (जीसीए) सरकारने लीजवर क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी दिली आहे. मात्र मागील सात वर्षे जीसीएने क्रिकेट मैदानासंदर्भात काहीच हालचाल केलेली नाही, त्यामुळे करारानुसार पुढील दोन वर्षांत जीसीएने क्रिकेट मैदान बांधण्यासाठी काहीच हालचाल केली नाही तर ती जागा सरकार परत घेणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. आर्लेकर म्हणाले, सरकारने धारगळ येथे 9 लाख चौ.मी. जागा संपादीत केली. त्यात एका बाजूला आयुष इस्पितळ बांधले. 1.89 लाख चौै.मी. जागा क्रिक्रेट स्टेडियमसाठी दिली होती. मात्र, सात वर्षे उलटूनही स्टेडियमबाबत काहीच हालचाल दिसत नाही. धारगळ येथे क्रिकेट स्टेडियम होणार का, काम केव्हापासून सुरू होईल, जर होत नसेल तर सरकारने त्यातील 1 लाख चौै.मी जागेत क्रीडा संकुल बांधून स्विमींग पूल व इतर सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी आर्लेकर यांनी केली. त्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, 9 लाख 19 हजार 789 चौ.मी. जमीन धारगळ येथे संपादित केल्यानंतर आयुष इस्पितळ बांधण्यात आले. 1,89,0218 चौ.मी.जमीन जीसीएला क्रिक्रेट मैदानासाठी दिली होती. त्यांनी त्यासाठी 9 कोटी 47 लाख रुपये भरलेले असले तरी सात वर्षे काहीच काम सुरू केलेले नाही, त्यामुळे त्यांना 2024 मध्ये सरकारने कारणे दाखवा नोटीस बजावून जर क्रिकेट स्टेडियम बांधत नसाल तर ती जमीन परत का घेऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. सरकार त्यांना या जागेच्या बदल्यात दुसर्या जागेचा प्रस्ताव देण्यास तयार आहे किंवा जीसीएने म्हावळींगे येथील जागेत क्रिकेट स्टेडियम बांधत असल्यास सरकार त्यांना मदत करण्यास तयार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
गोव्यात क्रिकेट स्टेडियम व्हावे, अशी सरकारची भूमिका आहे. मात्र जीसीएने त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. करारानुसार पुढील दोन वर्षे धारगळमध्ये जीसीएने काहीच हालचाल केली नाही, तर ती जागा सरकार परत घेईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. यावेळी विरोधीपक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, जीसीएचा विचार धारगळमध्ये स्टेडियम बांधायचा नाही. असे दिसत असूनही सरकार गप्प का रहाते. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व्हावे, धारगळ येथे होत नसेल तर म्हावळींगे येथे व्हावे, अशी मागणी केली. आमदार जीत आरोलकर यांनी धारगळ येथे क्रिकेट स्टेडियम बांधण्याबाबत जीसीए गंभीर नाही त्यामुळे सरकारने करारानुसार कारवाईची मागणी केली. आमदार विजय सरदेसाई यांनी करारानुसार दोन वर्षे बाकी आहेत. त्यामुळे सरकारने पुढील दोन वर्षे वाट पहावी, व त्यानंतरच जागा परत घेण्याबाबतची कार्यवाही करावी, अशी सूचना केली व धारगळ येथे क्रिकेट स्टेडियम व्हावे ही माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची इच्छा होती असे सांगितले.
राज्यात गोवा सरकारच्या क्रीडा खात्याने 153 मैदाने विविध ठिकाणी बांधली आहेत. त्यापैकी फक्त 10 ते 12 वापरण्यात येतात. विविध क्रीडा संघटनांना उर्वरित मैदाने वापरण्यास आणि त्यांची निगा राखण्यास देण्याची सरकारची तयारी आहे. मात्र क्रीडा संघटना पुढे येत नाहीत. इतर राज्यांमध्ये तालुक्यात एक मैदान नसते, मात्र गोव्यामध्ये प्रत्येक पंचायत क्षेत्रामध्ये चांगल्यात चांगली मैदाने असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.