Goan Food Recipe Pudhari
गोवा

Ganpati Food Recipe: १५ ते ४५ मिनिटांत तयार करता येतील असे गोंयचे खास तीन पदार्थ

Ganpati Special Food Recipe in marathi: गणपतीत लाडक्या बाप्पासाठी आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी कोणते पदार्थ करायचे?

पुढारी वृत्तसेवा

Goan Food Recipe Naralache Sandan Ukadpendi Puranache Ladu

पणजी : महाराष्ट्र आणि गोव्यात सध्या गणेशोत्सवाची तयारी सुरू असून गणपतीत लाडक्या बाप्पासाठी आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी कोणते पदार्थ करायचे यावर खलबतं सुरू आहेत. गोव्यातील नारळाचे सांदण, पूरणाचे लाडू आणि उकडपेंडी या तीन पदार्थांची पाककृती खास ‘पुढारी’च्या वाचकांसाठी...

1.      नारळाचे सांदण

साहित्य: दोन चमचे तूप दाटसर नारळाचे दूध दोन वाट्या,(एका नारळाचा रस) तांदूळ पीठ एक वाटी, गूळ एक वाटी, वेलची व जायफळाची पूड एक चमचा, काजूगर सजावटीसाठी.

कृती :  नारळ फोडून खोबरे किसून घ्यावे. नंतर किसलेले खोबरे मिक्सरला पाणी घालून वाटून घ्यावे तो रस  गाळणीतून गाळून  घ्यावा. नारळाच्या रसात गुळ विरघळून घ्यावा व परत गाळण्याने गाळून घ्यावे. हा गाळलेला रस जाड बुडाच्या पातेल्यात ओतून गॅसवर ठेवावा.त्यात दोन चमचे तूप घालावे व मिश्रण गरम होत आल्यावर  सतत ढवळत राहून तांदळाची पिठी ओतावी. गुठल्या होऊ देऊ नये. सतत ढवळत राहावे. गॅस मंद आचेवर ठेवावा. थोड्यावेळाने मिश्रण दाटसर होत आल्यावर पातेले उतरून घ्यावे व थंड झाल्यावर खावे.

दुसरी पद्धत

सर्व मिश्रण (तांदळाचे पीठ, गूळ, नारळाचा रस वेलची, तूप सगळे पदार्थ )एकत्र करून एका ताटलीत (ढोकळा करतात तशा ताटलीत) ओतून १५ मिनिटे वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात.

या मिश्रणाच्या लहान आकाराच्या २०/२५ वड्या होतात.

लागणारा कालावधी : अर्धा तास

2.       पूरणाचे लाडू

साहित्य :  एक वाटी चणाडाळ, एक वाटी गुळ, वेलचीपूड एक चमचा, काजूगर अर्धी वाटी, तूप मोठे दोन चमचे,  अर्धी वाटी ओले खोबरे.

कृती : चणाडाळ स्वच्छ धुऊन तीन वाट्या पाणी कुकरमध्ये घालून शिजवून घ्यावी. साधारणपणे पाच शिट्ट्या कराव्यात. कुकरची वाफ गेल्यानंतर शिजवलेली डाळ चाळणीत ओतून नितळून घ्यावी. नंतर गुळ व डाळ मिक्स करून घ्यावे व पातेल्यात दोन चमचे तूप घालून डाळ व गुळाचे मिश्रण ओतावे. सतत ढवळत राहावे. मिश्रण घट्ट होत आल्यावर (गोळा होत आल्यावर) त्यात ओले खोबरे, वेलची पूड घालावी व सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून गॅस बंद करावा. थोड्यावेळाने मिश्रण थंड झाल्यावर (अंदाजे १५-२० मिनिटांनी) त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून लाडू वळावेत. या प्रमाणात 15 ते 20 लाडू होतात.

लागणारा कालावधी : पाऊण तास

3.      उकडपेंडी  

साहित्य: पातळसर ताक दोन वाट्या, तांदुळाचे पीठ एक वाटी, फोडणीसाठी दोन चमचे तेल, कढीपत्ता पाच सहा पाने, एक चमचा मोहरी,एक चमचा जिरे, पाव चमचा हिंग, दोन ओल्या मिरच्यांचे तुकडे,  चवीपुरते मीठ आणि पाव चमचा हळद.

कृती : पातळसर ताकात तांदूळ पीठ कालवून घ्यावे. नंतर पातेले गॅसवर ठेवून त्यांत फोडणीसाठी तेल घालावे. तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे,हिंग,हळद, कढीपत्ता, ओल्या मिरच्यांचे तुकडे घालावे व नंतर मिश्रण ओतावे. मंद गॅसवर हळूहळू ढवळत राहावे. दाटसर झाल्यावर (गोळा होत आल्यावर) गॅस बंद करावा. थंड झाल्यावर पानात वाढावे.

या मापात होणारा हा पदार्थ ३/४ व्यक्तींसाठी पुरेल.

लागणारा कालावधी : १५ मिनिटे

दुसरी पद्धत :  दोन वाट्या ताकात  दोन वाट्या तांदूळ पीठ (भाकरी करण्यासाठी भिजवतात तसे) पीठ भिजवून घ्यावे .त्यात चवीनुसार  मीठ, थोडीशी हळद, ओल्या मिरच्यांचे तुकडे घालून पीठ मळून घ्यावे. नंतर पानावर लहानसा गोळा करून थापून घ्यावे व तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूने भाजून घ्यावे.

या मापात होणारा हा पदार्थ ३/४ व्यक्तींसाठी पुरेल.

लागणारा कालावधी : १५ मिनिटे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT