Ganesha Idol Stolen 
गोवा

Ganesha Idol Stolen | म्हापशात धक्कादायक प्रकार! विसर्जन स्थळावरून चांदीच्या दागिन्यांसह गणेशमूर्तीच गायब

Ganesha Idol Stolen | तार-म्हापसा येथील प्रकार : मूर्तीच्या अंगावर चांदीचे दागिने

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
दीड दिवसाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करत असतानाच तार-म्हापसा येथे एका कुटुंबाची मूर्ती चोरीस जाण्याची घटना घडली आहे. त्यामुळे कुटुंबातील लहान मुलास धक्का बसला असून, तो सतत रडत असल्याचे सांगितले जात आहे.

मंगळवारी सर्वत्र दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाची धावपळ सुरू होती. तशीच येथेही दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी आणल्या जात होत्या. घरातून विसर्जनाची सर्व तयारी करून एका कुटुंबाने आपल्या बाप्पाची मूर्ती खासगी वाहनातून विसर्जन स्थळी आणली. मूर्ती वाहनातून बाहेर काढताना तेथे आलेल्या एका व्यक्तीने विसर्जनासाठी मदत करतो, असे सांगून थेट मूर्तीच उचलून नेली.

त्यानंतर त्या कुटुंबाने सुमारे ४० मिनिटे शोधाशोध करूनही विसर्जनस्थळी मूर्ती अथवा ती व्यक्ती दिसून आली नाही. याबाबत एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्या कुटुंबाने सांगितले की, रात्री ९ ते ९.३० वा. सुमारास मूर्ती विसर्जनस्थळी आणली असता आपल्या मुलांनी वाहनाबाहेर काढली. त्याचा पाट आणि इतर साहित्य बाहेर काढत असताना एक युवक तेथे आला.

आपण गणपती विसर्जनास मदत करतो म्हणून गणपती हातात घेतला आणि क्षणात तेथून गायब झाला. त्याचा सुमारे ४० मिनिटे शोध घेतला. परंतु, ना मूर्ती सापडली, ना ती व्यक्ती दिसून आली. त्याने असे का केले हे समजलेले नाही. या सर्व प्रकारामुळे या कुटुंबातील नऊ वर्षाच्या मुलाला मात्र धक्का बसला आहे. तो सतत रडत आहे. दागिने गेल्याचे त्याला अथवा कुटुंबाला दुःख नसून किमान मूर्ती आपल्या हाताने विसर्जित करता यायला हवी होती, असे त्याचे म्हणणे असल्याचे कुटुंबाने सांगितले.

पोलिसांत तक्रार

गणेश मूर्तीच्या अंगावर चांदीचा हार, दुर्वा जोडी, जानवे, मुकुट आदी दागिने होते. या प्रकाराची माहिती घटनास्थळी असलेल्या पोलिसांना देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घरी येऊन म्हापसा पोलिस स्थानकांत तक्रार दिल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT