वास्को : सरकारी नोकर्या देण्याचे आमिष दाखवून संबंधितांकडून रक्कम घेऊन त्यांची फसवणूक करणारे बायणातील उमा पाटील व तिचा मुलगा शिवम पाटील यांचे मोठे कारनामे आता उघड होऊ लागले आहेत. गितेश गोपाळ नाईक व त्यांची पत्नी सोनाली नाईक यांना सरकारी नोकर्या देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 18 लाख 45 हजार रुपये उमा पाटील व शिवम पाटील यांनी घेतले होते.
याप्रकरणी गितेश पाटील यांनी वास्को पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. त्या तक्रारीची दखल घेऊन वास्को पोलिसांनी उमा व शिवम यांच्या विरोधात फसवणूक गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, आल्त दाबोळी येथील गितेश नाईक यांना वाहतूक खात्यामध्ये तर त्यांची पत्नी सोनाली यांना वीज खात्यामध्ये नोकरी देण्याचे आमिष उमा पाटील व शिवम यांनी दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतली. नोव्हेंबर 2020 मध्ये सदर प्रकरण घडले होते. तथापि, एवढी मोठी हाती पडल्यावर उमा व शिवमने त्या दोघांना नोकर्या देण्याचे नाव घेतले नाही. नोकरीही नाही, निदान पैसे तरी परत करा असा तगादा नाईक यांनी लावला होता. मात्र, त्यांच्या हाती एक कवडीही पडली नाही. नोकरी नाही, पैसे गेल्याने शेवटी नाईक यांनी वास्को पोलिस स्थानकात धाव घेत तक्रार केली. उमा पाटील व शिवम यांच्या विरोधात यापूर्वी दोघीजणींनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे ते दोघे दोन दिवस पोलिस कोठडीत होते. आता आणखी एक गुन्हा नोंद झाला आहे.
वास्को पोलिसांनी आतापर्यंत चार जणांविरोधात गुन्हे दाखल करून अटक केली होती. तर दक्षा तळवणेकर हिच्याविरोधात शुक्रवारी तक्रार दाखल झाल्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढे ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ज्याची फसवणूक झाली आहे, त्यांच्यामध्ये हळूहळू जागृती होऊन ते तक्रारी करण्यास पुढे येत आहेत.