मडगाव : पुढारी वृत्तसेवा
बाणावली येथे चार वर्षांच्या बालिकेला पेटत्या मणबत्तीने चटके देऊन तिचा छळ केल्याच्या आरोपाखाली कोलवा पोलिसांनी हजरत अली मेहबूबसाब कलकेरी (वय २७, मूळ कारवार-कर्नाटक, सध्या बाणावली) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालिकेची आई नौकरीनिमित्त कुवेतला गेल्याने तिने आपल्या चार आणि आठ वर्षांच्या मुलींना दवर्ली येथील नातेवाईकांकडे ठेवले होते. १० ऑक्टोबर रोजी संशयिताच्या सांगण्यावरून दोन्ही मुलींना बाणावली येथील त्याच्या घरी नेण्यात आले.
१ नोव्हेंबर रोजी मुलींना परत आणल्यानंतर चार वर्षांच्या बालिकेच्या अंगावर भाजल्याच्या गंभीर जखमा दिसून आल्या. मोठ्या बहिणीकडे चौकशी केली असता, जेवताना लहान बहिणीकडून शौच झाल्याने घर अस्वच्छ झाल्याच्या रागातून संशयिताने दोन्हीना मारहाण केल्याचे समोर आले. तसेच लहान बालिकेच्या गुप्तांगासह शरीराच्या अन्य भागांवर पेटत्या मणबत्तीने चटके दिल्याचा आरोप आहे.
वास्को येथील 'सवेरा ट्रस्ट'च्या अध्यक्षा तारा केरकर यांनी या घटनेची माहिती मिळताच कोलवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमासह पोक्सो कायद्याचे कलम ८ आणि गोवा बाल कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला.
संशयिताला न्यायालयात हजर केले असता, पुढील तपाससाठी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावन्यात आली. महिला पोलिस उपनिरीक्षक हर्पदा नाईक-देसाई तपास करत आहेत.