गोव्यातील किल्ले. Pudhari File Photo
गोवा

Shiv Jayanti 2025 : विविध राजवटींच्या इतिहासाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोव्यातील किल्ले

पुढारी वृत्तसेवा

अजरामर स्थापत्यकलेच्या वारशाचे प्रतीक आणि विविध राजवटींच्या इतिहासाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोव्यातील किल्ले. गोव्यावर कदंब, दिल्लीचे सुलतान, आदिलशहा आणि पोर्तुगीज अशा अनेक सत्ताधार्‍यांनी राज्य केले. सर्व राजवटींमध्ये भक्कमपणे पाय रोवून उभे असलेले इथले दुर्ग राज्याच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देतात. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे किल्ले अनेकांनी काबीज करण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र त्यांचा पाया भक्कम असल्याने त्यावर कोणतीच राजवट कायमस्वरूपी हक्क गाजवू शकली नाही. या किल्ल्यांची शतकानुशतकांची परंपरा गोवेकर अविरतपणे जोपासत आहेत. ही वारसा स्थळे जगाच्या पाठीवर राज्याचे ऐतिहासिक प्रतिनिधित्व करून इथल्या परंपरा आणि इतिहासाला जिवंत ठेवण्यासाठी प्रमुख ठिकाणे बनली आहेत. पोर्तुगीज आणि अन्य राजवटींच्या ताब्यात असलेले हे किल्ले गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या प्रत्येकाच्या बलिदानाचे समर्पण अधोरेखित करतात...

खोर्जुवे किल्ला

बार्देश तालुक्यातील खोर्जुवे बेटावर हा किल्ला आहे. सुरुवातीला इ.स. 1550 मध्ये हा किल्ला बांधण्यात आला होता. त्यानंतर 1705 मध्ये तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर कॅटानो डी मेलो डी कॅस्ट्रो यांनी भोसलेंकडून हे बेट घेतले होते. त्यानंतर जुन्या किल्ल्याची दुरुस्ती आणि मजबुतीकरण करण्यात आल्यानंतर 18 व्या शतकाच्या सुरुवातीला पूर्णपणे पुनर्बांधणी करण्यात आली. शत्रूंच्या हल्ल्यापासून उत्तरेकडील हद्दीचे संरक्षण करणे हा किल्ल्याचा मुख्य उद्देश होता. हा किल्ला सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लष्करी युद्धाभ्यासाचे ठिकाण म्हणूनही काम करत असे. खोर्जुवे किल्ल्याच्या स्थापत्यकलेला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. खोर्जुवे किल्ला हा चिर्‍याच्या दगडाने बांधलेला आहे. चौकोनी आकारात बांधलेल्या, याच्या चारही कोपर्‍यांवर तोफांसाठी नक्षीदार बुरूज आहेत. किल्ल्याच्या प्रत्येक कोपर्‍यात तटबंदीसारखी पायरी आहे. गोव्यातील महत्त्वाच्या किल्ल्यांमध्ये खुर्द किल्ल्याला गणले जाते.

रेईश मागुश किल्ला

रेईश मागुश किल्ला हा वेरे, बार्देश येथे मांडवी नदीच्या उजव्या तीरावर दक्षिण-पूर्व टोकावर मोक्याच्या ठिकाणी बांधण्यात आला आहे. इ. स. 1551 बांधलेल्या या किल्ल्याचे इ. स. 1707 मध्ये पुनर्बांधणी आणि विस्तारीकरण करण्यात आले. आकाराने लहान असलेला हा किल्ला मिरामार, आग्वाद किल्ला, काबो किल्ला अशा किल्ल्यांवर नजर ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत होता. पोर्तुगिजांच्या ताब्यापूर्वी विजापूरच्या आदिलशहाने तेथे चौकी बांधली. बार्देशमधील पहिले चर्च म्हणजेच रेईश मागुश. चर्चच्या बांधकामानंतर किल्ल्याला रेईश मागुश हे नाव देण्यात आले. स्वातंत्र्यापूर्वी या किल्ल्याचा उपयोग राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी केला जात होता. तिथे अनेक प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात ठेवण्यात आले होते आणि स्वातंत्र्यानंतर त्याचे उपजेलमध्ये रूपांतर करण्यात आले. या किल्ल्यामध्ये पूर्वी व्हाईसरॉय आणि लिस्बनहून नव्याने आलेल्या किंवा त्या मार्गावर आलेल्या अन्य मान्यवरांना ठेवण्यात येत असे.

काब-द-राम किल्ला

काणकोण येथील काब-द-राम या किल्ल्याने गोव्यातील प्रगल्भ इतिहासात महत्त्वाचे योगदान दिले. किल्ल्याने कधी हिंदू शासकांनी, तर कधी मुस्लिम शासकांचे नियंत्रण अनुभवले. इ. स.1763 पर्यंत किल्ला सोंडा राजाच्या ताब्यात होता. 1763 मध्ये पोर्तुगिजांनी तो सोंडा राजाच्या ताब्यातून जिंकून घेतला आणि गोव्याच्या उर्वरित वसाहती राजवटीत तो त्यांच्याच ताब्यात राहिला. किल्ल्याचा लष्करी बुरूज म्हणून उपयोग झाला नाही, त्यामुळे 1946 मध्ये त्याचे तुरुंगात रूपांतर करण्यात आले आणि 1955 पर्यंत त्याचा तुरुंग म्हणून उपयोग केला गेला. हा किल्ला विविध प्रकारच्या बुरुजांनी वेढलेला आहे. याच्या प्रवेशद्वारावर खोल खंदक आहे. किल्ल्यात सेंट अ‍ॅन्थनीचे चॅपल, बॅरेक आणि दोन झरे आहेत. लोपेस मेंडेस यांनी नमूद केल्याप्रमाणे, 19 व्या शतकात लष्करी बॅरेकचा वापर पायदळ आणि तोफखाना म्हणून केला जात असे. किल्ल्याच्या आवारात लाईट हाऊसचे अवशेषही पाहायला मिळतात. या किल्ल्याला भगवान श्री राम यांच्या नावावरून हे नाव मिळाले आहे. अयोध्येतून निर्वासित झालेल्या काळात प्रभू राम आणि सीता यांनी येथे आश्रय घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे किल्ल्याला त्यांचे नाव देण्यात आले.

शापोरा किल्ला

शापोरा किल्ला बार्देश तालुक्यातील शापोरा नदीच्या मुखावरील कायसूव गावाच्या टेकडीवर आहे. शापोरा किल्ला इ. स.1717 मध्ये गोव्याचे तत्कालीन पोर्तुगीज व्हाईसरॉय काऊंट ऑफ एरिकेराच्या कार्यकाळात बांधण्यात आला होता. हे पोर्तुगिजांच्या संरक्षणाच्या हेतूने तसेच व्यापाराच्या द़ृष्टीने नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने हा किल्ला महत्त्वाचा होता. इ. स. 1739 मध्ये सावंतवाडीच्या भोसलेे यांनी किल्ला ताब्यात घेतला. दोन वर्षे ताब्यात ठेवल्यानंतर पोर्तुगिजांनी किल्ला परत आपल्या ताब्यात घेतला. किल्ल्याचा इतिहास मोठा आणि वैविध्यपूर्ण आहे. या किल्ल्यावर अनेक राजवटींच्या खुणा दिसून येतात. पोर्तुगिजांनी किल्ला ताब्यात घेण्यापूर्वी शासक सुलतान आदिलशाह याच्या मालकीच्या जुन्या लष्करी चौकीच्या अवशेषांवर शापोरा किल्ला बांधला होता. नदीच्या विरुद्ध काठावर असलेल्या पेडणेवर राज्य करणार्‍या सावंतवाडीच्या महाराजांनी केलेल्या आक्रमणापासून त्यांच्या उत्तरेकडील सीमेचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा होता. इ. स. 1684 मध्ये मराठ्यांचे शासक छत्रपती संभाजी महाराज यांच्या सैन्याला रोखण्यात पोर्तुगीज असमर्थ ठरले. मात्र, इ. स. 1717 मध्ये किल्ला पुन्हा पोर्तुगिजांकडे परत आला. त्यानंतर त्यांनी किल्ल्याची पुनर्बांधणी केली. त्यांनी शत्रूचा वेढा पडल्यास बचाव करण्यासाठी गुप्त भूमिगत मार्ग बांधले. तत्कालीन इतिहासाच्या पाऊलखुणा पाहता किल्ल्याचे लष्करी महत्त्व आणि पोर्तुगिजांच्या इतिहासाची साक्ष देतात.

तेरेखोल किल्ला

तेरेखोल किल्ला मुळात सावंतवाडीचे महाराज खेम सावंत-भोसले यांनी बांधला होता. इ. स.1746 मध्ये पोर्तुगीज आक्रमणकर्त्यांनी तो त्यांच्याकडून जिंकून घेतला. त्यानंतर इ.स. 1764 मध्ये त्यांच्याद्वारे किल्ल्यात सुधारणा केल्यानंतर, तो एक महत्त्वाचा लष्करी बुरूज, तेरेखोल नदीच्या मुखाचा संरक्षक आणि गोव्याच्या पोर्तुगीज वसाहतीसाठी संरक्षणाचे पहिले ठिकाण बनला. पुढे गोव्याचे पहिले गोव्यात जन्मलेले व्हाईसरॉय डॉ. बर्नार्डो पेरेस दा सिल्वा यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरांचा गड म्हणून त्याचा वापर करण्यात आला. तथापि, बंडखोर सैन्याचा पाडाव झाला आणि किल्ला साम्राज्यात परत आला. हा किल्ला गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामात अनेक ऐतिहासिक सत्याग्रह मोर्चांची साक्ष देणारी महत्त्वाची वास्तू आहे. पुढे 1950 च्या दशकात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोव्यातील पोर्तुगिजांचा प्रभाव कमी झाल्याने हा किल्ला गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक बनला आणि येथे अनेक सत्याग्रह-मोर्चे निघाले. गोव्यातील नि:शस्त्र सत्याग्रहींना अनेक वेळा पोर्तुगीज वसाहतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले आणि गोव्याच्या मुक्तीसाठी आपले प्राण अर्पण केले. त्या सर्व आहुत्यांना आपल्या बाहुपाशात घेणारा हा किल्ला गोव्याच्या इतिहासात आपले महत्त्व राखून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT