पणजी : पुढारी वृत्तसेवा
मोपमधील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यावर होणाऱ्या फॉर्म्युला ४ रेसिंग कार शर्यतीच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (राष्ट्रीय महामार्ग), पणजी कार्यालयामार्फत यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. या कामात मोप विमानतळ रस्त्यावर २.१ किलोमीटर लांबीचा फॉर्म्युला ४ रेस ट्रॅक उभारण्याचा समावेश आहे. यासोबतच रेस ट्रॅकच्या उभारणीस अडथळा ठरणाऱ्या विविध सेवा-सुविधांचे (वीज वाहिन्या, पाणीपुरवठा लाईन्स, दूरसंचार केबल्स आदी) स्थलांतर करण्याचे कामही या प्रकल्पाचा भाग आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा अंदाजे खर्च ४ कोटी ३२ लाख ७६ हजार ४२६ रुपये २५ पैसे इतका निश्चित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही कामे अत्यंत कालमर्यादित असून ती वेळेत पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे निविदा दस्तऐवजात नमूद केले आहे. राज्य सरकारकडून आंतरराष्ट्रीय मोटर स्पोर्टस् स्पर्धांचे आयोजन करण्यावर भर दिला जात असून, फॉर्म्युला ४ रेसमुळे गोव्याच्या पर्यटनाला, विशेषतः उत्तर गोव्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.